आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक दररोज भरतात दहा हजारांहून अधिक दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी सोलापूरकर दररोज वाहतूक शाखेत दहाहजार दंड भरतात. पण, शिस्त पाळण्यात त्यांना स्वारस्य नाही असे दिसून येते. वाहतूक पोलिस अचानक कोठेही मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करतात. वाहन परवाना नाही, ओव्हरसीट प्रवासी वाहतूक आदी कलमांखाली कारवाई होते. त्यापोटी किमान दहाहजाराहून अधिक दंड जमा होतो. आपण शिस्त पाळली तर दंड होणार नाही. वाहतूकही सुरळीत होईल. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सिग्नल चौकासह मुख्य रस्त्यावरील चौकात पन्नास मीटर नो पार्किंग झोन आहे. त्या ठिकाणी वाहने लागतात, अतिक्रमण आहे. पोलिसांनी व महापालिका अतिक्रमण विभागाने रस्ता मोकळा ठेवणे गरजेचे असून तसे होताना दिसत नाही.
नो पार्किंगची अंमलबजावणी होईल
नो पार्किंग, समविषम, एकेरी मार्ग फलक लावण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. फलक लावल्यानंतर अधिक सक्षमपणे या नियमाचा वापर करण्यासाठी अंमलबजावणी केली जाईल. महापालिका अधिकार्‍यांशी बुधवारी परत चर्चा करून याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे सहायक पोलिस आयुक्त मोरेश्वर आत्राम यांनी सांगितले.
खासगी संस्थांची मदत घ्या
बॅरीकेडिंग, फलक लावण्यासाठी खासगी संस्था यांची मदत घेता येईल का याबाबत विचार व्हावा. अनेक संस्था समाजहितासाठी मदत द्यायला तयार आहेत. त्यामुळे व्यपारी, उद्योजक यांच्याकडे प्रस्ताव दिल्यास मदत मिळेल.
सात चौकात सिग्नल सुरू
तेरा सिग्नलपैकी सात चौकात सिग्नल सुरू झाले आहे. आसरा, पत्रकारभवन, गांधीनगर, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सरस्वती चौक, करीन चौक, संत तुकाराम चौक या ठिकाणी सिग्नल सुरू आहेत अशी माहिती महापलिका विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. मागील आठवड्यात दोनच चौकात सिग्नल सुरू होते.

प्रवासी रिक्षातील ओव्हरसीट सुरूच
रिक्षा, अ‍ॅपेरिक्षामध्ये ओव्हरसीट प्रवासी वाहतूक सुरूच आहे. मागील पंधरवड्यात अशा रिक्षांवर वाहतूक करताना कारवाई झाली होती. काही दिवसानंतर ही मोहीम थांबली आहे.