आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृहे असतानाही नागरिकांचे हाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जुना एम्प्लॉयमेंट चौकात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सह्याद्री शॉपिंग सेंटरमध्ये स्वच्छतागृहे आहेत; पण त्याचा वापर ठरावीक गाळेधारक करीत असल्याने येथे येणारे ग्राहक व इतर गाळेधारकांचे हाल होत आहेत. या ठिकाणी असलेल्या नळाचे कनेक्शनही गेल्या अनेक वर्षांपासून गायब झाले असून, येथे पिण्याच्या पाण्याची सोयही नाही.

1982 मध्ये जुना एम्प्लॉयमेंट चौकात महापालिकेने सह्याद्री शॉपिंग सेंटर या तीन मजली इमारतीची उभारणी केली. यात तळमजल्यावर 48 गाळे आहेत. तसेच वरच्या दोन मजल्यांवर मोठी कार्यालये आहेत. वरच्या दोन्ही मजल्यावर प्रत्येकी दोन स्वच्छतागृहे आहेत. तसेच तळमजल्यावरील 48 गाळेधारकांसाठी स्वच्छतागृह तयार करण्यात आले होते. यात महिला व पुरुष अशी दोन स्वतंत्र स्वच्छतागृहे होती. सुरुवातीला शॉपिंग सेंटरच्या मागील बाजूस भाजी मंडई होती.

सुविधेचा उपयोग नाही
भाजी मंडईतील लोकांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले होते. 1995 मध्ये येथील भाजीमंडई बंद करून महापालिकेकडून तेथे कर्मशियल कॉम्प्लेक्स उभारण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक शौचालय बंद झाले. दरम्यानच्या काळात 48 गाळेधारकांसाठी तयार करण्यात आलेल्या स्वच्छतागृहांवर कर्मशियल कॉम्प्लेक्समधील काही गाळेधारकांनी ताबा मिळवला. त्यामुळे येथील जुन्या गाळेधारकांची पंचाईत झाली. याबाबत गाळेधारकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रार केली. पण, महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. स्वच्छतागृहांची सुविधा असतानाही त्याचा उपयोग होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.


पिण्याच्या पाण्याची बोंब
सह्याद्री शॉपिंग सेंटरच्या उभारणी वेळी येथे स्वच्छतागृह आणि महापालिकेच्या दोन नळांचे कनेक्शन होते. त्या नळाद्वारे गाळेधारकांना पिण्यासाठी पाणी मिळत होते. मात्र कालांतराने ते नळ कनेक्शन बंद झाले की, गायब झाले हे कोणालाच माहीत नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच आहेत. गाळेधारकांसाठी सध्या पाणी पिण्यास मिळत नाही.


स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय केली
सह्याद्री शॉपिंग सेंटरमधील स्वच्छतागृह धूळखात पडले होते. पाण्याची सोयही येथे नव्हती. काही दिवसांपूर्वी मी माझ्या वॉर्ड वाईज निधीतून गाळेधारकांसाठी स्वच्छतागृह खुले करून दिले आणि पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. श्रीदेवी फुलारे, नगरसेविका

येथे चालते मोजक्याच गाळेधारकांची मालकी
41992 पासून शॉपिंग सेंटरमध्ये आहे. पूर्वी येथे स्वच्छतागृह होते. मात्र, आता या स्वच्छतागृहांवर काही मोजक्या गाळेधारकांचीच मालकी चालत आहे. आमच्यासाठी एकही स्वच्छतागृह नाही. महापालिका याबाबत काहीच पावले उचलत नाही. सतीश कुलकर्णी, गाळेधारक

पार्किंगच्या जागेचा होतोय गैरवापर
शॉपिंग सेंटरच्या पार्किंग जागेचा वापर भाजीपाला आणि फळे स्वच्छ करण्यासाठी केला जातो. त्यामुळे ग्राहक व गाळेधारकांचा येण्या-जाण्यासाठी असलेला मार्ग बंद होत आहे. तसेच येथे पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृह नाही. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे. अशोक धुळेराव, गाळेधारक

तक्रार आल्यास तपासणी
सह्याद्री शॉपिंग सेंटर संदर्भात अद्यापही कसलीही तक्रार आली नाही. तेथील समस्येबाबत मला काहीच माहीत नाही. तक्रार आल्यास त्याची पाहणी करून निश्चित समस्या सोडवली जाईल. एस. डी. माईनहळ्ळीकर, झोन अधिकारी क्रमांक सात