आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर ‘सिव्हिल’वर पडतोय मोठा ताण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील स्वतंत्र जिल्हा रुग्णालय नसल्याने या विभागाच्या विकास निधी, औषधे इतर आरोग्य सुविधांपासून सोलापूरला वंचित राहावे लागत आहे.
सध्याचे छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल) वैद्यकीय महाविद्यालयाला जोडलेले असल्याने त्यावर राज्याच्या उच्चतंत्र शिक्षण विभागाचेच नियंत्रण राहिले आहे. आरोग्य विभागापासून ते दूरच राहिले आहे. त्यामुळे सोलापूरची एकूण लोकसंख्या, अपघाताचे वाढते प्रमाण, शेजारच्या जिल्ह्यातूनही येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता स्वतंत्र जिल्हा रुग्णालयाची गरज भासू लागली आहे.
तावडेंशी सुविधांबाबत चर्चा करणार

उच्चतंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी बोलून शासकीय रुग्णालयात सुविधा वाढवण्याबाबत चर्चा करणार. जिल्हा रुग्णालयासाठी प्रस्ताव नसेल तर तो देऊन रुग्णालयासाठी प्रयत्न करू. विजयकुमार देशमुख (पालकमंत्री)

जिल्हा रुग्णालय प्रस्तावित

सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय उच्च तंत्र शिक्षण विभागाकडे आहे. त्यामुळे स्वतंत्र जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे आहे. जुन्या मेडिकल कॉलेजची इमारत जागा जिल्हा रुग्णालयासाठी वर्ग करून मिळावी यासाठीचाही एक प्रस्ताव संचालक, वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेला आहे. दिनकररावखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्हा रुग्णालयामुळे फायदा

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली जिल्हा रुग्णालये कार्यरत आहेत. पण, सोलापुरातील सिव्हिल रुग्णालय पूर्णपणे वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग झाल्याने त्यावर आता उच्चतंत्र शिक्षण विभागाचे नियंत्रण आले आहे. रुग्णांना तेथे आजही वैद्यकीय सेवा मिळते, पण सुविधांचा मोठा अभाव तेथे दिसतो आहे.
सिव्हिल सर्जन त्यांच्या अधिपत्याखालील वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतात. शिवाय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून औषधे, वैद्यकीय सेवांसाठीचा निधी मोठ्या प्रमाणात मिळतो. त्याचा फायदा वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी होतो. ट्रॉमा सेंटरसह इतर सुविधांमध्ये वाढ होऊ शकते.

२०११मध्ये अनेक पदे रद्द

वैद्यकीयमहाविद्यालयाला जोडलेल्या रुग्णालयांचा सर्व स्टाफ उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २०११ पासून सिव्हिलमध्ये वैद्यकीय अधिकारी दर्जाची २६ पदे रद्द झाली. तो स्टाफ इतरत्र वर्ग झाला. आजही जर जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा निर्णय झाला तर ही पदे पुन्हा सोलापूरच्या वैद्यकीय सेवेत दाखल होऊ शकतात.
सध्याच्या सिव्हिलमध्ये जो स्टाफ भरला गेला आहे, तो वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाला (वैद्यकीय शिक्षण देण्याला) प्राधान्य देऊन भरला गेला आहे. त्याचा वैद्यकीय महाविद्यालयाला अधिक फायदा आहे.

सिव्हिलची दुर्दशा

शासकीय रुग्णालयातील सुविधांचा सध्या मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो आहे. तेथे अद्ययावत तातडीच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. ‘आयसीयू’ विभागही तेवढा सक्षम नाही. तेथे वातानुकूलित वातावरण दिसत नाही. पाण्याचे दुर्भिक्ष आहे. कर्मचाऱ्यांच्या संख्येचाही मोठ्या प्रमाणात अभाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून चतुर्थश्रेणी कर्मचारी भरले गेले नाहीत. तेथे कोणती यंत्रणा उभारायची म्हटली की, उच्चतंत्र शिक्षण विभागाकडे प्रस्ताव देऊन वाट पाहावी लागते. त्यामुळे हे सर्व टाळून सोलापूरकरांना चांगली सुविधा देण्यासाठी सोलापुरात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील स्वतंत्र रुग्णालयाची गरज आहे. या विभागाचा निधी मिळाला तर कर्मचारीवर्ग वाढू शकतो. सुविधाही मोठ्या प्रमाणात वाढतील.

अन्य जिल्ह्यात स्वतंत्र रुग्णालये
पुणे येथे ससून रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाला जोडले गेल्याने पुण्यात औंध येथे स्वतंत्र जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे २०० खाटांचे आरोग्य विभागाचे स्वतंत्र रुग्णालय उभारले गेले आहे. नांदेडसह अन्य काही जिल्ह्यातही अशी स्वतंत्र जिल्हा रुग्णालये आहेत. कोल्हापूर येथे नुकतेच स्वतंत्र शासकीय रुग्णालय मंजूर झाले आहे. त्याचे काम सुरू आहे. नाशिकसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये स्वतंत्र रुग्णालयांचे प्रस्ताव शासनाकडे आहेत. सोलापूरसाठीही प्रयत्न झाले तर स्वतंत्र रुग्णालय उभे राहू शकेल.

प्रस्ताव मागेच दिला

स्वतंत्र शासकीय रुग्णालयासाठी मागच्या सरकारमध्येच प्रस्ताव दिला आहे, त्या प्रस्तावावर काम सुरू आहे. प्रस्ताव मंजूर होऊन नवीन शासकीय रूग्णालय उभारावे यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत.प्रणिती शिंदे(आमदार)

प्रस्ताव मंजुरीसाठी करणार प्रयत्न
प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करणार. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या सूचना ऐकून घेणार आहोत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही भेटू. सुभाष देशमुख (आमदार)