आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात होता साधेपणा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सहकारात सुसंस्कारित माणसे आली तर त्यांच्या संस्थाच नव्हे, तर त्यातील लोकही मोठे होतात. संस्कार संपला की तिथे फक्त स्वाहाकारच उरतो, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले. साेलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालकांनी संस्कारांच्या शिदाेरीवर बँक वाढवली.
भविष्याचा वेध घेत आत्मविश्वासाने प्रगती साधली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या आरंभ सोहळ्यासाठी ते आले होते. होटगी रस्त्यावरील हेरिटेजच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतिक अधिकारी डॉ. अशोकराव कुकडे प्रमुख पाहुणे होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार अॅड. शरद बनसोडे, आमदार सुभाष देशमुख, प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. बँकेचे अध्यक्ष जगदीश तुळजापूरकर यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णमहोत्सव समितीचे अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी महोत्सव काळातील विविध योजनांची माहिती दिली.

श्री. फडणवीस म्हणाले, “सहकारी बँकांनी अनेक संकटांचा सामना केला. भविष्यातही अनेक आव्हाने उभी आहेत. पण विश्वास, व्यवसाय आणि तंत्रज्ञान ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या संस्था निश्चित पुढे जातील.

बँकेचे उपाध्यक्ष डॉ. पी. के. जोशी यांनी आभार मानले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण दुधाट, संचालक अपर्णा फडके, भूपती सामलेटी, वल्लभदास गोयदानी, महेश अंदेली, गिरीश बोरगांवकर, डॉ. चिदानंद बासुतकर, संजय चाबुकस्वार, प्रा. गजानन धरणे, मुकुंद देवधर, तेजा कुलकर्णी, अशोक सरवदे, सेवक संचालक भारत तांबोळकर, आदी उपस्थित होते.
खासदार बनसोडे यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटनानंतर परतणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मोबाइलमध्ये टिपण्यासाठी तरुणांची धडपड.

प्रथा झाली बंद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना शासकीय मानवंदना देण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फडणवीस यांना विमानतळावर मानवंदना देण्यात आली नाही.

ठोस आश्वासन नाहीच

मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस प्रथमच सोलापूरला आले. शहरासाठी ठोस काही असे आश्वासन देतील, असा आशा होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली.

सुवर्णलक्ष्मी ठेव आणि उद्यम कर्ज योजना सुरू

सुवर्णमहोत्सवी वर्षाचे आचित्य साधून बँकेने दोन योजना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू केल्या. एक सुवर्णलक्ष्मी ठेव योजना आणि दुसरी सुवर्ण उद्यम कर्ज योजना. दोन्ही योजनांचे प्रतिकात्मक अनावरण झाले. १८ वर्षांनंतर मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज आवश्यक असल्यास शैक्षणिक कर्जाच्या प्रचलित व्याजदरात ०.२५ टक्के सवलतही या वेळी जाहीर करण्यात आली.

विश्वासावरच यश

विश्वासाच्या आधारावर सोलापूर जनता सहकारी बँकेने यश मिळवले. सहकारातील मूलभूत भावना कायम ठेवून व्यावसायिक गुणवत्ता जपत बँकेने प्रगतीचा पल्ला गाठला. उत्तम अशा तांत्रिक गोष्टी, तज्ज्ञ आणि ध्येयवादी संचालकच ही कामगिरी करू शकतात. डॉ.अशोकराव कुकडे, रा.स्व.संघाचे प्रांतिक अधिकारी

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला मंगळवारी सुरुवात झाली.
लोक प्रतिनिधीचे कार्यालय असले पाहिजे असा आग्रह भाजपचा असतो. माझ्या कार्यालयात रोज सुमारे हजार निवेदन येतात. त्यावर प्राधान्याने काम करून ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची कामे झाली पाहिजे. सोलापूर शहर राज्यातील महत्त्वाचे शहर आहे. त्यासाठी शहराचा विकास अधिक गतीने झाला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

खासदार बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अॅड. शरद बनसोडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहा मिनिटांच्या भाषणात शहर विकासाचे मुद्दे मांडले. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गर्दी झाली होती.
बसवेश्वरांच्या शिकवणीनुसार कारभार करू
महात्मा बसवेश्वरांनी जगाला शांततेची, समतेची शिकवण दिली आहे. तीच शिकवण आपण अनुसरून या राज्याचा कारभार करू तसेच राज्याचा चांगला कारभार करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला बळ द्यावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बसवेश्वर जयंतीनिमित्त कौंतम चौक येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केल्यानंतर झालेल्या छोटेखानी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख होते. तत्पूर्वी पालकमंत्री विजय देशमुख यांनी, सोलापूर जिल्ह्याला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेताना मुख्यमंत्री महोदयांनी अक्कलकोट रोड येथे नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी मदत करावी, विडी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा पुष्पहार, फेटा बसव मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.