आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर विकासाकरिता मुख्यमंत्र्यांना साकडे - खा.अॅ.शरद बनसोडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री मंगळवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. शहराच्या विकासासंदर्भात त्यांच्यासमोर साकडे घालणार असल्याची माहिती, खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी दिली.
शहरातील शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहाच्या आवारातील खासदार बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे उद््घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त खासदार बनसोडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अनुभवही सांगितले.
खासदार बनसोडे म्हणाले, “केंद्र सरकारच्या अर्थ समितीमध्ये मी आहे. यामुळे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली. यानिमित्त ऑस्ट्रेलियातील उद्योग आणि गुंतवणुकीची माहिती मिळाली. ऑस्ट्रेलियातील गुंतवणूकदार, उद्योजक स्थिर आहेत. कंपनी रजिस्टर झाली की ते शेअर मार्केटमध्ये येतात. त्यानुसार तेथील शेअर बाजाराचा भाव काढला जातो.
भारतात ३० कंपन्यांसमोर ठेवून दर काढला जातो. ऑस्ट्रेलियाचा विकास दर १२ टक्के आहे. भारताचा ७.५ टक्के आहे. आपला विकास दर 8 ते 9 टक्केपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशाची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू आहे. मागच्या सरकारने काय केले, यावर बोलण्यापेक्षा आम्ही काय करू शकतो हे बोलणे योग्य आहे.”

शहराच्या विकासासाठी उजनीतून पाणी हिप्परगा तलाव येथे आणणे, एनटीपीसीकडून महापालिकेला वाढीव ६० कोटी निधी देण्याचा प्रयत्न आहे. एनटीपीसीकडून मिळालेल्या रकमेवर त्वरित काम सुरू करणे आवश्यक असताना महापालिका त्यास वेगळे वळण देत १२४० कोटींची योजना आखत आहेत.

एनटीपीसी निधीतून त्वरित काम सुरू करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर शहराचे प्रश्न मांडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार बनसोडे यांनी सांगितले.

आज संपर्क कार्यालयाचे उद््घाटन
शिंदे चौकातील शिवस्मारक आवारात खासदार बनसोडे यांचे संपर्क कार्यालय असून त्याचे नूतनीकरण करण्यात आले. त्याचे उद््घाटन मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस करणार आहेत. या वेळी जाहीर भाषण होणार आहे. त्यानुसार तयारी झाली असल्याची माहिती, खासदार अॅड. बनसोडे यांनी दिली.

केंद्राच्या बजेटमधील १० टक्के निधी राज्यांना

केंद्र सरकारच्या बजेटमधून दहा टक्के निधी देशातील राज्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पाच लाख कोटी निधी मिळेल. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे. विकासासाठी जमीन आवश्यक आहे. ती जमीन खरेदी करून सरकार चौपट मोबदला देणार अाहे. त्यावर लोकहिताची कामे केली जातील. आता यापुढे शेतकऱ्यांचे ३३ टक्के नुकसान झाले तर त्याची भरपाई दिली जाणार आहे. मागील सरकारच्या नुकसान भरपाईपेक्षा ही आकडेवारी दीडपट आहे.