आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Factory Burning At Barshi ; One And Half Crores Damaged

बार्शीत कोळसा कारखान्यांना आग; दीड कोटीचे नुकसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी - येथील औद्योगिक वसाहत नं. 3 च्या पाठीमागे गाताचीवाडी शिवारातील भुश्श्यापासून कांडीकोळसा बनविणार्‍या विजयकुमार घोलप व श्वेता घोलप यांच्या अनुक्रमे लक्ष्मी कृषी ऊर्जा व यशराज बायो एनर्जी या कारखान्यांना आग लागून अंदाजे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागल्यानंतर दिवसभर बार्शी, तुळजापूर, उस्मानाबाद, सोलापूर, कुडरुवाडी येथील अग्निशामक दलाच्या बंबाच्या माध्यमातून आग विझविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी : येथील औद्योगिक वसाहत नं. 3 च्या पाठीमागे गाताचीवाडी शिवारात विजयकुमार माणिकराव घोलप यांचा लक्ष्मी कृषी ऊर्जा व श्वेता धनंजय घोलप यांचा यशराज बायो एनर्जी हा विविध प्रकारच्या भुश्श्यापासून कांडीकोळसा बनविण्याचा कारखाना आहे. कांडीकोळसा बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे भुश्श्याचा मोठा साठा कारखान्याच्या भोवती होता. आज सकाळी अचानक दहाच्या सुमारास बाहेर पडलेल्या भुश्श्याला आग लागली. आज दिवसभर सोसाट्याचे वारे असल्याने ही आग आत कारखान्यातही शिरली. त्यामुळे जवळच असलेल्या दोन्ही कारखान्यातील भुश्यापासून कांडी बनविण्यासाठी असणार्‍या प्रत्येकी 18 लाख रुपयांच्या मशिन्स व सुमारे 10 लाख रुपयांच्या प्रोसिसिंग व कन्व्हर्टर मशिन्स जळून खाक झाल्या. येथे 12 ते 13 टन कांडी कोळसा भरून तयार असलेल्या ट्रक ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

कारखान्यातील मोठय़ा प्रमाणावर असलेले अँग्रो वेस्ट व बगॅस असे सुमारे 75 लाख रुपयांचे कच्चे मटेरियल व सुमारे 3 लाख रुपयांचे तयार मटेरियल, मशिनरी व शेड असे अंदाजे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, आगीचे स्वरूप मोठे असल्याने बार्शीसह, सोलापूर, उस्मानाबाद, कुडरुवाडी, तुळजापूर येथील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. सायंकाळपर्यंत 50 बंबाद्वारे पाण्याचा फवारा केल्यानंतरही आग पूर्णपणे आटोक्यात आली नव्हती. रात्री उशिरापर्यंतही आग विझविण्याचे काम सुरूच होते. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

वार्‍याने केला घात
मंगळवारी जोराचे वारे वाहत असल्याने आग झपाट्याने पसरत होती. त्यामुळे बार्शीच्या नगरपालिकेच्या तीन गाड्या, तसेच इतर ठिकाणाहून मागवलेल्या व खासगी अशा जवळपास 8 ते 10 बंब व टँकरच्या माध्यमातून पाणी आणून फवारण्यात येत असतानाही जोराच्या वार्‍यामुळे आग आटोक्यात आणण्यात लवकर यश आले नाही.