आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collector Dr.gedam Speaking About Solapur District Administration

गतिमान कारभार अन् शाश्वत प्रशासकीय कामांना सदैव प्राधान्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एकीकडे पाणीटंचाई अन् दुष्काळाची वाढती तीव्रता, नागरिकांच्या प्रशासनाकडून वाढलेल्या अपेक्षा अशा प्रतिकूल स्थितीत सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदाची माझ्यावर जबाबदारी आली. पाण्याचे सूक्ष्म नियोजन, रात्रीचा दिवस करून आढावा घेऊन कागदावरील नियोजन प्रत्यक्षात उतरवले अन् दुष्काळाचा डोंगर आम्ही सर केल्यावर क्षणभर विसावलो. येत्या वर्षामध्ये निवडणुकांचे आव्हान आमच्यापुढे आहे, त्याचबरोबर खूप काही संकल्पना, उपक्रम राबवणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

25 जानेवारीला डॉ. गेडाम यांचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण होतोय. त्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांबरोबर अनौपचारिक गप्पा मारल्या. मागे वळून पाहताना झालेल्या काही कामांबाबत मी असमाधानी आहे अशी स्पष्ट कबुली देण्याबरोबर येत्या वर्षामध्ये मात्र त्या पूर्ण करणारच, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त होता. दुष्काळाचा डोंगर पार करताना अनेक मदतीचे हात पुढे आले. त्यांचा यथोचित सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याची संकल्पना मांडली. त्यास प्रशासनातील अधिकार्‍यांचे सहकार्य मिळाले अन् वेगळा उपक्रम यशस्वी झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज सुसूत्रता आण्याबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाचे नियोजन झाले. मतदार यादीमध्ये नाव नसणारी तब्बल साडेतीन लाख मतदारांची नावे आम्ही वगळली. त्याचबरोबर माळढोक अभयारण्याच्या परिक्षेत्रातून अवैध मुरूम उपसा करणार्‍या ठेकेदाराची चौकशी पूर्ण केली. त्याचबरोबर सर्व दगड खाणींच्या अद्ययावत यंत्राद्वारे मोजणी करून नियमापेक्षा जास्त उपसा केलेल्यांवर दंडात्मक कारवाईची तयारी झालीय. माळढोक अभयारण्याचा तिढा सोडविण्याबरोबर तेथील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली.

केंद्रीय राखीव दलासाठी हन्नूर व टाकळी येथील जमिनीचे संपादन करण्याचे आव्हान आम्ही काही दिवसांमध्ये पूर्ण केले. त्यासाठी थेट वरिष्ठ अधिकार्‍यांऐवजी सहाय्यक अधिकार्‍यांबरोबर टेबल टू टेबल बैठका घेऊन ती प्रक्रिया पूर्ण केली. पंढरपुरात येणार्‍या वारकर्‍यांच्या सोयीसाठी सुलभ इंटरनॅशनलतर्फे स्वच्छतागृह उभारण्यास मंजुरी मिळाली. तब्बल 56 कोटींचा प्रकल्प मंजूर झाला असून वारीदरम्यान त्याचा मोठा फायदा होईल. तलाठय़ांच्या 87 जागांबरोबर जिल्हा परिषद, उत्पादन शुल्क विभागाची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये अडचणी व अतिक्रमण हटविण्याचे आव्हानात्मक काम यशस्वी झाले. पुरवठा विभागाचा कारभार पारदर्शक करण्यासाठी दुकानांची तपासणी मोहीम राबवली.

त्यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर धडक कारवाई केली. त्याचा चांगला परिणाम दिसून येतोय. राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांना, शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्याबाबत आढावा बैठक घेऊन ‘विशेष’ सूचना दिल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीवर तोडगा निघाला. प्रशासकीय कामांना शिस्त लावण्यासाठी कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या केल्या. खंडकरी शेतकर्‍यांना जमिनीचे वाटप करण्याबरोबर त्यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर कारवाईचा प्रस्तावही शासनाकडे सादर केला. वर्षभरात राबविण्यात येणार्‍या कामांची गती वाढविण्याबरोबर नवीन कामांना प्राधान्य देणार असल्याचे, डॉ. गेडाम यांनी सांगितले.