आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छतेच्या विळख्यात जिल्हाधिकारी कार्यालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कचरा, मोकाट जनावरे, तुंबलेली स्वच्छतागृहे यामुळे पसरलेली दुर्गंधी, गुटखा, तंबाखूच्या पिचकार्‍याने रंगलेल्या भिंती, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची टंचाई अशा विविध समस्यांच्या विळख्यात जिल्हाधिकारी कार्यालय अडकले आहे. त्यामुळे कार्यालयीन कर्मचार्‍यांसह ग्रामीण भागातून कामानिमित्त येणार्‍या नागरिकांची कुचंबणा होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांचे कार्यालयाच्या मुख्य इमारतीचा परिसर स्वच्छ आहे. इतर कार्यालय व परिसराची दुरवस्था झालीय.

मध्यवर्ती इमारतीमधील स्वच्छतागृहांची अनेक महिन्यांपासून स्वच्छता नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्या परिसरात वाहने अस्ताव्यस्त लावत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील भागात मोकाट कुत्री झोपलेली असतात. त्याच मजल्यावरील एका कोपर्‍यात पिण्याच्या पाण्यासाठी टाकी करण्यात आली आहे. त्यातून सांडणार्‍या पाण्यामुळे सर्वत्र दलदल होते.

नगर भूमापन कार्यालयाच्या शेजारील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. पाणी नसल्याने कर्मचार्‍यांसह नागरिकांची कुंचबणा होते. त्या इमारतीमध्ये कृषी अधीक्षक कार्यालय असून कामानिमित्त ग्रामीण भागातून येणार्‍या शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सेतू सुविधा केंद्र शेजारील भूसंपादन कार्यालय परिसर, सेतू सुविधा केंद्र, सामान्य शाखा, नगरपालिका व करमणूक कर कार्यालयाच्या परिसरात अस्वच्छता आहे. करमणूक कर कार्यालय परिसरात स्वच्छतागृहाची दुर्गंधी पसरली आहे.