आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालवाडी शिक्षिका व सेविकांना सेवा शाश्वती द्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बालवाडी शिक्षिका व सेविकांना सेवा शाश्वती आणि वेतनर्शेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी खासगी बालवाडी शिक्षिका व सेविकांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलनात सुमारे 500 शिक्षिका व सेविकांनी सहभाग नोंदवला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खासगी बालवाडी शिक्षिका कर्मचारी महासंघाच्या राज्य सचिव अनुराधा कुलकर्णी यांनी दिली.
महाराष्ट्रात खासगी प्राथमिक शाळांना जोडून असंख्य बालवाड्या चालतात. तसेच, काही महिला मंडळेही बालवाड्या चालवतात. परंतु या बालवाड्यांना शासनाचे कोणतेही नियम अथवा मान्यता नाही. त्यामुळे येथे काम करणार्‍या शिक्षिका व सेविका यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक शोषण होत आहे. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर विद्यार्थ्यांचा पाया घडवण्याचे काम बालवाडी शिक्षिका करीत असतात. शिक्षणातील या महत्त्वाच्या घटकाकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी हे आंदोलन करण्यात येत आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. या वेळी जिल्हाध्यक्ष अमृता डांगे, जिल्हा सचिव सोनी धुळम आणि शिक्षक महासंघाचे राज्य प्रसिद्धीप्रमुख कृष्णा हिरेमठ आदींसह शिक्षिका व सेविका उपस्थित होत्या.
प्राथमिक शाळांना जोडून व स्वतंत्र बालवाड्यांना शासन मान्यता मिळावी, शाश्वती व वेतनर्शेणी लागू करावी, बालवाडीची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारावी, बालवाड्यांना बालशिक्षक हक्ककायदा लागू करावा, बालवाडीचा अभ्यासक्रम निश्चित करावा, सर्व बालवाड्यांना शासनाने अनुदान द्यावे, बालवाडीच्या मुलांना शालेय पोषण आहार दिला जावा, बालवाडीची वेळ सर्वत्र समान असावी.