आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या कामालाच मी प्राधान्य देणार आहे. आता चुका टाळून उजनी धरणातील पाण्याचे नियोजन केले जाईल, असे नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. पारदर्शी कामकाजासाठी फारसे वेगळे काही करत नाही, शासनाच्या ‘जीआर’नुसारच काम करतो, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. डॉ. गेडाम यांनी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता डाकबंगला येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गोकुळ मवारे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन डॉ. गेडाम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांच्यासह उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिस्तप्रिय व पारदर्शी कारभार करणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. गेडाम यांच्या यशस्वी कार्याचे गमक काय? असा प्रश्न विचारल्यानंतर हसतमुखाने पत्रकारांच्या प्रश्नांना सहज उत्तरे देताना ते म्हणाले की, पारदर्शी काम करताना विशेष काही करावे लागत नाही. मी शासनाच्या ‘जीआर’नुसारच काम करतो. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने बदली होऊन आपण आलात, या प्रश्नावर ते म्हणाले की, यंदा दुष्काळात अन्नधान्याची टंचाई नसून, पाण्याची आहे. पाणी, रोहयो कामे आणि जनावरांना चारा व पाणी आदी बाबींना प्राधान्य देऊन काम करणार आहे.
उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी असताना डॉ. गेडाम यांनी तुळजाभवानी मंदिराचा विकास केला होता. आता पंढरपूरचे विठ्ठल मंदिर व ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराचा विकास रखडल्याच्या प्रश्नावर डॉ. गेडाम म्हणाले की, मंदिराबाबतची सर्व माहिती घेऊनच काम करावे लागते आणि आपण नक्कीच चांगले काम करू. दुपारी दोनपासून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह अनेकांनी चकरा मारून डॉ. गेडाम यांनी पदभार स्वीकारला की नाही याची माहिती घेतली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास डॉ. गेडाम यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आगमन झाले. त्यावेळी नागरिकांसह अनेकांनी गर्दी केली होती. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी डॉ. गेडाम यांचे स्वागत केले.
चुकांवर बोलण्याची ही वेळ नाही.. - उजनी धरणातील पाण्याचे ढिसाळ नियोजन झाल्यानेच जिल्ह्याला कृत्रिम टंचाईला तोंड द्यावे लागल्याच्या प्रश्नावर डॉ. गेडाम म्हणाले की, चुका झाल्या असतील तर आताची वेळ त्यावर बोलण्याची नाही. चुका टाळून नियोजनानुसार काम करण्याची आहे. आता उजनीतील शिल्लक पाणीसाठय़ाचे योग्य नियोजन केले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.