आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही महाविद्यालये मागताहेत डोनेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अकरावी शुल्क आकारणीविषयी महाविद्यालयांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. प्रवेशासाठी काही महाविद्यालये डोनेशन, अव्वाच्या सव्वा शुल्क घेत आहेत. तशी तक्रार विद्यार्थी संघटनेने शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे. त्यानंतर हा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. डोनेशन घेतल्याचे आढळल्यास कारवाई होणार आहे.

नामांकित महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेवर माध्यमिक शिक्षण विभाग लक्ष ठेवणार आहे. या महाविद्यालयांच्या रिक्त जागांवर शिक्षण विभागाकडून दिल्या जाणार्‍या यादीनुसार प्रवेश प्रक्रिया करण्याचे सूचित करण्यात येणार आहे. प्रवेश मिळाला नसल्यास शिक्षण विभागाकडे अर्ज दाखल करावेत. निर्णयाबाबत शिक्षण उपनिरीक्षक सूर्यकांत सूतार म्हणाले, मागील वर्षाप्रमाणेच रिक्त जागांसाठी यादी पाठविली जाणार आहे.

प्राचार्यांच्या बैठकीत सहा महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपले अनुदानित व विनाअनुदानित प्रवेश पूर्ण झाल्याची माहिती शिक्षण विभागाला दिली होती. रिक्त जागांची यादी जाहीर करताना या महाविद्यालयांना वगळण्यात आले होते. प्रत्यक्षात ‘संगमेश्वर’, ‘वालचंद’ व ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयात विनाअनुदानित तुकडीच्या काही जागा रिक्त आहेत. तेथे प्रवेश देताना डोनेशन व शुल्क वसूल केले जात आहे. ही रक्कम दिल्यासच प्रवेश मिळतो. हे काय गौडबंगाल आहे, अशी विचारणा संघटनेने केली आहे.

वालचंद महाविद्यालय नॉट रिचेबल
वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मोबाइल दिवसभर स्वीच ऑफ होता. सायंकाळी सातच्या सुमारास तो सुरू होता, मात्र त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. 7.40 ला त्यांना याबाबत एसएमएस पाठवला. मात्र त्याचे उत्तरही आले नाही.


20 हजार हे माफक शुल्क
यंदा अकरावी विज्ञानच्या एका विनाअनुदानित तुकडीसाठी प्रस्ताव दिला आहे. यातून 60 ते 80 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. शुल्क केवळ 20 हजार रुपये आहे. डोनेशन घेतले जात नाही. माफक शुल्क ठेवले आहे.’’ डॉ. राजन अन्यापनावर, प्राचार्य, संगमेश्वर महाविद्यालय

डोनेशन नाही, शुल्क घेतो
ए. डी. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये विनाअनुदानित तुकडी असल्याने प्रती विद्यार्थी 22 हजार रुपये शुल्क आहे. त्याची रीतसर पावती दिली जाते. कोणत्याही प्रकारचे डोनेशन घेतले जात नाही.’’ प्रवीण देशपांडे, प्राचार्य, ए.डी. जोशी ज्यु. कॉलेज

विनाअनुदानित तुकडीस शुल्क
एकूण वार्षिक खर्च भागिले विद्यार्थी संख्या आणि अधिक 20 टक्केअसे शुल्क मंजूर होत असते. मात्र हे सर्व अधिकार पुणे उपसंचालक कार्यालयाकडे आहेत. त्यावरील नियंत्रण आमच्या अखत्यारीत नाही. पालक-शिक्षक संघाने मंजूर केलेल्या शुल्काचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जातो.’’ विद्या शिंदे, शिक्षणाधिकारी माध्यमिक, सोलापूर विभाग

डोनेशन मागितले जात आहे
विनाअनुदानित तुकडी, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेशासाठी डोनेशन मागितले जात आहे. जागा भरल्यचे सांगत ‘संगमेश्वर’, ‘वालचंद’ येथे जादा डोनेशन मागितले गेले. याबाबत कारवाई करावी.’’ लहू गायकवाड, जिल्हाध्यक्ष, भारतीय विद्यार्थी सेना