आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषमता हटेपर्यंत डाव्यांची चळवळ संपणार नाही -भाकपचे ज्येष्ठ नेते अँड. पानसरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भानगडी केलेल्या, घोटाळे केलेले कम्युनिस्टांमध्ये बिलकुल चालत नाहीत. चारित्र्यसंपन्नता आणि निष्ठा हेच डाव्यांचे भांडवल आहे. त्याच्या जोरावरच त्यांची चळवळ असून, जोपर्यंत विषमता हटणार नाही; तोपर्यंत ही चळवळ संपणार नाही, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अँड. गोविंद पानसरे यांनी सांगितले.

दिवंगत स्वातंत्र्यसेनानी नारायणराव आडम प्रबोधन केंद्राच्या वतीने रविवारी व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘महाराष्ट्रातील डावी चळवळ’ हा व्याख्यानाचा विषय होता. माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य नरसय्या आडम अध्यक्षस्थानी होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

अँड. पानसरे म्हणाले, ‘डाव्यांनी सत्तेसाठी कधीच राजकारण केले नाही. विचार, तत्त्वज्ञान आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीतून त्यांनी जनतेचे प्रश्न मांडले. डाव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रश्नाचा अभ्यास. त्यावर आधारित मांडणी. खासदार ए. के. गोपालन, भूपेश गुप्ता यांची संसदेतील भाषणे ऐकण्यासाठी पंडित नेहरू आतूर व्हायचे. एवढा अभ्यास असूनही डाव्यांनी सत्तेची लालसा केली नाही. केंद्रातील पहिल्या संयुक्त पुरोगामी आघाडीला डाव्यांच्या 61 खासदारांनी पाठिंबा दिला. त्या वेळी सत्तेत सहभागी होण्याचे आमंत्रण होते; परंतु आम्ही लालदिव्याच्या गाड्या नाकारल्या. एकच अट घातली ती किमान समान कार्यक्रमाची. देशातल्या सामान्यांसाठी हा कार्यक्रम होता. त्यासाठी हा दबावगट होता. सरकारवर डाव्यांचा अंकुश होता.’

आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेची सत्ता येणार नाही. आघाडी सरकारेच येतील. अशी दुबळे सरकारेच लोकांची कामे करू शकतील, असे इतिहास सांगतो. अशा सरकारांवर अंकुश ठेवण्याचे काम डावे करू शकतील, इतकी शक्ती निश्चित मिळवतील, असा विश्वासही अँड. पानसरे यांनी व्यक्त केला. प्रबोधन केंद्राचे सचिव एम. एच. शेख यांनी प्रास्ताविक केले. अनिल वासम यांनी सूत्रसंचालन केले.

व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे झाली. त्यातील निवडक प्रश्न आणि त्यांची उत्तरे
प्रश्न : भारत-अमेरिका अणुकराराला विरोध योग्य; परंतु त्यावरून पाठिंबा काढणे योग्य होते का?
पानसरे : हा करारच देशहिताचा नव्हता. अमेरिकेचे ते जागतिकीकरण नव्हे; तर अगतिकीकरण होते.
प्रश्न : मार्क्‍सवाद मध्यमवर्गीयांत का जात नाही?
पानसरे : मध्यमवर्ग कमी पडला. सहाव्या वेतन आयोगाने तो आत्मकेंद्री झाला.
प्रश्न : मार्क्‍सवाद म्हणजे नेमके काय?
पानसरे : सर्वांनी काम करावे, सर्वांनी कमवावे आणि सर्वांनी खावे.
प्रश्न : नक्षलवाद्यांबाबत काय वाटते?
पानसरे : ते गरिबांचे प्रश्न मांडत आहेत; परंतु त्यांचा मार्ग चुकीचा आहे.