पंढरपूर - ‘पंढरपूर येथे येणा-या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या मानाने येथे सुविधांचा अभाव आहे. येथील प्रश्न तसेच विविध अडचणी सोडवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची येथेच बैठक घेण्यासाठी येत्या काळात
आपण आग्रही राहणार आहोत,’ असे आश्वासन राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिले.
कार्तिकी यात्रेनिमित्त श्रीविठ्ठलाची शासकीय महापूजा एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या हस्ते झाली. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या महापूजेच्या वेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील सुरेश कुलकर्णी (४७) व त्यांच्या पत्नी वंदना कुलकर्णी (४२) यांना मिळाला.
श्रीविठ्ठल व रुक्मिणी मातेची पारंपरिक पद्धतीने आणि विधिवत शासकीय महापूजा झाल्यानंतर श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांच्या हस्ते खडसे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुरेश कुलकर्णी व त्यांच्या पत्नी वंदना यांचा खडसे दांपत्याच्या हस्ते श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेची प्रतिमा, वर्षभर मोफत एस. टी. बस प्रवासाचा पास, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मंदिर समितीचे प्रमुख अण्णा डांगे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार सुरेश खाडे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, विभागीय आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते.
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यामधील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीविठ्ठल, राही आणि रखुमाईच्या मूर्तींची शहरातून निघणारी रथयात्रा होय. येथील माहेश्वरी धर्मशाळेपासून सोमवारी दुपारी या रथयात्रेस उत्साहात सुरुवात झाली. या वेळी शेकडो वारकरी रथावरती खारीक, बत्तासे उधळून मनोभावे श्रीविठ्ठलाचे दर्शन घेत होते. या रथावर येथील देवधर, रानडे आणि नातू यांना बसण्याचा मान आहे. तर हा रथ ओढण्याचा मान येथील वडार समाजातील बांधवांना आहे.
तीन लाखांवर भाविक
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून आणि शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच मध्य प्रदेशातून रेल्वे, एस.टी. आणि खासगी वाहनांमधून सोमवारी पहाटेपर्यंत सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले हाेते. श्रीविठ्ठलाच्या दर्शनाची रांग दुपारी चारच्या दरम्यान गोपाळपूर रस्त्यावरील चार क्रमांकाच्या पत्राशेडमध्ये गेली होती. पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे १२ ते १३ तासांचा कालावधी लागत होता.
भजन, कीर्तनात भाविक दंग
“बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” आणि सावळ्या विठुनामाच्या जयघोषाने पुण्यनगरी असलेली पंढरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. “विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ।। विठ्ठल सुखा विठ्ठल दु:खा । तुक्या मुखा विठ्ठल ।।” या संत वचनाप्रमाणे शहरातील मठ, धर्मशाळा तसेच वाड्यांमध्ये आणि चंद्रभागेच्या विस्तीर्ण पसरलेल्या वाळवंटात भजन, कीर्तन आणि प्रवचनात भाविक दंग झाल्याचे दिसत होते.
भाविकांची संख्या कमी
मागील वर्षीच्या कार्तिकी यात्रेची तुलना करता यावर्षी यात्रेसाठी येणा-या भाविकांच्या संख्येत कमालीची घट झालेली दिसत आहे. महागाई, यात्रांमध्ये गर्दीमुळे सोय न होणे तसेच सध्या शेतीची सुरू असलेली कामे अशा विविध कारणांमुळे यात्रेतील भाविकांची संख्या कमी दिसत असल्याचे येथील काही व्यापा-यांकडून सांगण्यात आले.