आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner Chandrakant Gudewar News In Marathi, Water Supply, Divya Marathi

पाणीपुरवठ्यात हयगय केल्याप्रकरणी उपअभियंतासह चार चावीवाले निलंबित; 16 जणांच्या बदल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील विस्कळीत पाणीपुरवठाप्रश्नी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे गंभीर झाले असून पाणीपुरवठ्यात हयगय केल्याप्रकरणी त्यांनी रविवारी उपअभियंता युसूफ मुजावर यांच्यासह चार चावीवाल्यांना निलंबित केले. तसेच वजनदार नगरसेवकांच्या कृपेने वर्षानुवर्षे एकाच प्रभागात ठाण मांडून बसलेल्या 16 चावीवाल्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. शिवाय सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि स्वत:च्या घरी प्रमाणपेक्षा जादा पाणी सोडणाºया चावीवाल्यावर आयुक्त गुडेवार यांनी निलंबनाची कारवाई केली.

पाणीपुरवठ्यात हयगय केल्याप्रकरणी जयराम बंगाळे, जॉन गवळी, ब्रम्हानंद शिंदे, बाळू धडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच अवंतीनगर, दयानंद कॉलेज, कस्तुरबा, रेल्वे लाइन, पश्रीवल पाण्याच्या टाकीवरून पाणी सोडणाºया चावीवाल्यांची उचलबांगडी करण्यात आली. नगरसेवक सुरेश पाटील, देवेंद्र कोठे, मनोहर सपाटे, आनंद चंदनशिवे, आरिफ शेख, रफिक हत्तुरे, जगदीश पाटील, चेतन नरोटे हे या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात.

आयुक्तांची कारवाई मोहीम स्वत:च्या घरापासून
आयुक्त गुडेवार यांनी कारवाईची मोहीम स्वत:पासून सुरू केली. स्वत:च्या घरासह सार्वजनिक आरोग्य अभियंता वसंत शेटे यांच्या घरी प्रमाणापेक्षा जादा पाणी सोडणे. तसेच प्रभागातही जास्त पाणी सोडल्याने चावीवाला जयराम बंगाळे यांना निलंबित करण्यात आले. स्वत:च्या घरी जास्त पाणी आल्याने चावीवाल्यावर कारवाई करण्याची पहिलीच वेळ आहे.

तत्काळ बैठक आणि कारवाई
शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महापालिका आयुक्तांनी वजनदार नगरसेवकांच्या प्रभागातील चावीवाल्यांची रविवारी सायंकाळी चार वाजता तत्काळ बैठक घेतली. त्यानंतर पाणीपुरवठ्यात हयगय केल्याप्रकरणी चार चावीवाल्यांना निलंबित तर 16 चावीवाल्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

उपअभियंता मुजावर निलंबित
झोन क्रमांक चारचे उपअभियंता युसूफ मुजावर यांची शनिवारी पाणीपुरवठा नियंत्रण कक्षात रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत नेमणूक असताना ते गैरहजर होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले तर त्यांच्या विरोधात उपअभियंता विजय राठोड यांनी पोलिसांत तक्रार दिली.

आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई
पाणीपुरवठ्यात हयगय केल्याने उपअभियंता मुजावर, चार चावीवाल्यांना निलंबित करण्यात आले आहे. 16 चावीवाल्यांची बदली करण्यात आली. आयुक्तांनी पाणीपुरवठ्यावर बैठक घेतली. त्यात त्यांनी आदेश देत कारवाई केली. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली.
विजय राठोड, उपअभियंता