सोलापूर - सोमवारी रात्री आठला पोलिस आयुक्त प्रदीप रासकर शिवाजी चौकात आले. पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के, सहायक निरीक्षक मोगल, श्री. चौगुले यांच्याशी संवाद साधत सूचना दिल्या. चौकातील वाहतूक सुरळीत करा, कायमस्वरूपी अतिक्रमण हटवा, अॅपेरिक्षा, खाद्यविक्रेते यांना बाजूला करा. पुन्हा बेशिस्त वाहतुकीचे नव्याचे नऊ दिवस होतील असे काम करू नका, अशी तंबीच अधिकाऱ्यांना दिली.
शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे अपघात वाढले आहेत. अॅपेरिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढला आहे. पोलिसांनाही ते जुमानत नाहीत, नियम पाळत नाही. याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये चीड आहे. दोन दिवसांपूर्वी शिवाजी चौकात काकडी विकणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी दिवसभर वाहतूक जॅम होती. दररोजच या ठिकाणी बेशिस्त वाहतूक पाहायला मिळत होती. याबाबत ‘दिव्य मराठी’ने सोमवारी प्रकाश टाकला होता. याची दखल घेत सकाळपासूनच पोलिसांनी नियोजन सुरू केले.
शिवाजी चौक ते सिद्धेश्वर हॉस्पिटल मार्गावरील हातगाडी विक्रेते, खाद्य विक्रेते यांना फूटपाथच्या बाजूला थांबण्यासाठी सूचना दिल्या आहेत. बसस्थानकाजवळ सिटीबस स्टॉपसमोर बॅरिकेडिंग लावण्यात आले असून त्याच्या आताच बस थांबविण्यासाठी सूचना आहेत. बसस्थानकासमोरील आऊटगेट (पूर्वीचे) बॅरिकेडिंग लावून दुभाजक बंद करण्यात आले आहे.
एसटीबस; आऊटगेट बदलले
एसटीबससाठीइनगेट (पूर्वीचे) बंद करण्यात आले आहेत. आऊट गेटमधून इनगेट करण्यात आले आहे. बस बाहेर जाण्यासाठी बुधवार पेठच्या दिशेला मुभा देण्यात आली आहे. रिक्षाचालकांनाही बसस्थानक कंपौंडच्या मोकळ्या जागेत थांबा देण्यात आला आहे.
शहरातील बेशिस्त, अवैध वाहतुकीवरील कारवाईविषयीविचारणा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त यांना याविषयी लेखी कळविण्याचेही आदेशहीदिले.