आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरज मुहूर्तावर 170 जोडप्यांच्या रेशीमगाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- लक्षावधी हातांनी उधळलेल्या अक्षतारूपी आशीर्वादाच्या मंडपाखाली लोकमंगल समूहातर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात रविवारी सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटे या गोरज मुहूर्तावर 170 जोडपी विवाहबद्ध झाली. अग्निभोवती सप्तपदी घेत हिंदू जोडप्यांचे विवाह झाले, तर मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध समाजातील जोडप्यांनीही आपापल्या विवाह पद्धतीनुसार सोहळ्यात सहभाग घेतला. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी हजारो वर्‍हाडी उपस्थित होते.

हरिभाई देवकरण प्रशालेच्या भव्य मैदानावर प्रति पंढरी अवतरली होती. विवाह सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर सावळ्या विठ्ठलाची लोभसवाणी भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. व्यासपीठावर संयोजक सुभाष देशमुख, रोहन देशमुख यांनी विवाह सोहळ्यातील सहभागी वधुवरांना नांदा सौख्य भरेचा संदेश देत भरूभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी जयसिद्धेश्वर महाराज, रेणुक शिवाचार्य महास्वामी, भाऊसाहेब महाराज, सुधाकर इंगळे महाराज, सुरेंद्रनाथ महाराज, बसवराज शास्त्री, प्रशांत बडवे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, अंजली चौगुले, मधुकर आठवले, विद्या शिंदे, शंकर वाघमारे, शहाजी पवार, अविनाश महागावकर आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात दोड्डी येथील पत्रकार सचिन गाडेकर यांचा विवाह याच गावातील प्रियंका हरनाळकर यांच्याशी झाला.

अक्षता सोहळ्यापूर्वी दुपारी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेटक्या नियोजनाचे दर्शन दिसून आले.

वरुणराजाने लावली अक्षता सोहळ्यास हजेरी
अक्षतांचा कार्यक्रम होताच आतषबाजी, तोफांची सलामी आणि रोषणाईने विविधांगी रंगांनी परिसर रंगून गेला. दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी वरुणराजाने कृपा दाखविली. त्यामुळे अगदी काही थेंब लग्नसोहळ्यानंतर पडले. वरुणराजानेही काही अक्षता टाकल्या. त्यालाही जणू गोरजमुहूर्त गाठावयाचा होता. सामूहिक विवाहसोहळ्याचे यंदाचे आठवे वष्रे होते. आतापर्यंत लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात 1561 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.

वरातीने लक्ष वेधले
विवाहापूर्वी दुपारी तीन वाजता सहभागी 170 जोडप्यांची भव्य वरात काढण्यात आली. 170 रिक्षा, विविध वाहने या मिरवणुकीत सहभागी झाली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वरात मुख्य विवाहमंडपात पोचली.