सोलापूर- काँग्रेस, महायुती व महाआघाडीला कदापि पाठिंबा द्यायचा नाही, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीने ठरवले आहे. तिसरी आघाडी हाच मतदारांसमोर सक्षम पर्याय असेल. त्यातून डाव्यांना 42 जागा मिळतील, असा दावा पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य नरसय्या आडम यांनी दिली. सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबत अद्याप भूमिका ठरलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्लीच्या पक्ष कार्यालयात सोमवारी केंद्रीय समितीची बैठक झाली. महासचिव प्रकाश कारत, पॉलिट ब्युरो सदस्य खासदार सीताराम येचुरी, महाराष्ट्र सचिव अशोक ढवळे यांच्यासह बडे नेतेमंडळी उपस्थित होती. तिसर्या आघाडीची औपचारिक घोषणा झाली तरी काही नेत्यांची भूमिका डळमळीत आहे. आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल महांतो भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांना बाजूला ठेवल्यास इतर 9 पक्षांची मोट बांधून तिसरा पर्याय सक्षम करण्याचे प्रयत्न असल्याचे र्शी. आडम म्हणाले.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारांनी गेल्या 10 वर्षांत भांडवलदारांच्या प्रभावाखाली काम केले. त्यात सामान्य माणसाचा विचार झालेला नाही. प्रचंड महागाई, भविष्याची हमी नाही, अशा असुरक्षिततेच्या वातावरणात तो जगत आहे. त्यातून बाहेर काढणारा कार्यक्रम कुठल्याच पक्षाकडे नाही. भाजपने तर नरेंद्र मोदींना भावी पंतप्रधान म्हणून जाहीर केले. त्यामुळे प्रखर जातीयवाद हाच त्यांचा मुख्य कार्यक्रम दिसून येतो. अशा स्थितीत डाव्या विचारांची तिसरी आघाडी हाच सर्वात्तम पर्याय असल्याचा निर्वाळा या बैठकीत देण्यात आला.
सोलापूरचा निर्णय नाही
सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघासाठी अद्याप कुठलीच भूमिका ठरलेली नाही. महाआघाडी, महायुती बाजूला ठेवल्यास राहतो फक्त ‘आम आदमी पक्ष.’ त्या पक्षाचा उमेदवारही जाहीर झाला. पण त्यांना पाठिंबा देण्याबाबत अद्याप विचार झालेला नाही. केंद्रीय समितीच याबाबत निश्चित धोरण ठरवेल. त्यानंतरच सोलापूरची भूमिका जाहीर करू, असेही श्री आडम म्हणाले.
सावध भूमिका?
गेल्या वेळी झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत माकपने बसपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. परंतु दारूण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे माकपवरच उलटली. प्रभावहीन बसपनेही त्यांची साथ सोडली. परिणामी शहर मध्य विधानसभा निवडणुकीत र्शी. आडम यांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर माकपने यंदा सावध भूमिका घेत असल्याचे दिसते.