आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धे विश्‍व : महिला वाहक विश्रांतीगृहालाच केले हिरकणी कक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्तनदा मातांना एसटी प्रवासात आपल्या तान्हुल्याला स्तनपान करता यावे याकरिता प्रत्येक एसटी स्थानकावर स्वतंत्र हिरकणी कक्ष उभारण्याचे आदेश आहेत. पण, सोलापूर एसटी आगारकडून अशाप्रकारचा कक्ष उभारण्यास विलंब केला जात आहे. शिवाय सोलापूर आगाराने महिला वाहक विश्रांती गृहालाच हिरकणी कक्ष केल्याचे उघड झाले आहे. यामुळे महिला प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील 250 एसटी स्थानकात हिरकणी नावाचे स्वतंत्र स्तनपान कक्ष उभारण्यात येत आहेत. त्यानुसार 8 बाय 10 ची स्वतंत्र खोली या हिरकणी कक्षासाठी निर्माण केली जात आहे. सोलापूर आगारात मात्र या उलट चित्र आहे. हिरकणी कक्षासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करण्याऐवजी महिला वाहक विश्रामगृहालाच हिरकणी कक्ष केल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. तसा फलक एसटी स्थानकावर लावण्यात आलेला आहे. पण, याचा लाभ महिला प्रवाशांना होतो का? याचे संशोधन होणे आवश्यक आहे.

एसटी प्रवास करताना स्तनदा मातांची गरज ओळखून ब्रेस्ट फिडींग प्रमोशनल नेटवर्क ऑफ इंडिया या संस्थेने हिरकणी कक्षाची स्थापना केली जावी अशा सूचना केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाच्या वतीने स्वतंत्र परिपत्रक काढून राज्यातील प्रत्येक आगार स्थानकात स्वतंत्र हिरकणी कक्ष उभे करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सोलापूर आगारात याची काटेकोर अंमलबजावणी झालेली नाही.


सोलापुरात केली जात आहे प्रवाशांची फसगत
सोलापूर विभागात महिला वाहक म्हणून काम करणार्‍या सर्व महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या विश्रांतीसाठी आगारात एक स्वतंत्र विश्रामकक्ष आहे. तिथे महिला कर्मचारी आपल्या सोयीनुसार आराम करतात. मात्र त्याच महिला कर्मचारी विश्राम गृहाला निळ्या रंगाच्या बोर्डाने सजवून हिरकणी कक्ष फक्त महिलांसाठी असे फलक लावले आहे. त्याच्या शेजारी कोणत्याही प्रकारचे सूचक बाळाचे किंवा आई बाळाला स्तनपान करतानाचे चित्रही नाही. त्यामुळे ज्यांना हिरकणी क क्षाची माहिती आहे त्यांना ही प्रवाशांची फसगतच वाटणार आहे.


हिरकणी कक्ष लवकरच स्थापन करण्यात यावे
राज्यात विविध ठिकाणी हिरकणी कक्ष होत असताना सोलापूरच्या महिलांनी का या सुविधेपासून वंचित राहायचे. सोलापूर विभागाने तातडीने हिरकणी कक्ष तयार करणे गरजेचे आहे. ते लवकरात लवकर करावे. विद्या शिंदे , अध्यक्ष, राष्ट्रवादी महिला आघाडी

परिपत्रक सक्तीचे नाही
परिपत्रक आले आहे ते काही सक्तीचे नाही, पत्रक आल्यानंतर मिटींग घेतली आहे. अजून जागेच्या शोधात आहोत. लवकरच हिरकणी कक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न करू . धनंजय थोरात, विभाग नियंत्रक, सोलापूर