आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress And Nationalist Congress News In Marathi, Solapur, Shinde

प्रचारात राष्ट्रवादीला बगल;आघाडीचा धर्म नावाला, प्रचारात केवळ काँग्रेस नेत्यांना स्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पक्षाचे उमेदवार आहेत. पण शिंदेंच्या प्रचाराचे बॅनर, रथ व जाहिरातींमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचे छायाचित्र व नावांचा उल्लेखही करण्यात येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. गळ्यात गळे घातल्याचा दिखावा करत काँग्रेस पायात पाय घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे वरून एकसंघ असल्याचा दावा करणार्‍या आघाडीमध्येही मानापनाचे नाट्य रंगल्याचे चित्र आहे.


गृहमंत्री शिंदेंच्या प्रचारासाठी काँग्रेसने सुशील विकास रथ, संकल्प रथ तयार केला. त्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार असा त्यांचा उल्लेख केलाय. पण त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांची छायाचित्रे व नावांचाही उल्लेख नाही. त्याऐवजी फक्त सोनिया गांधी, राहुल गांधी, श्री. शिंदे, विष्णुपंत कोठे व बाळासाहेब शेळके यांची छायाचित्रे आहेत. एकीकडे आघाडीचे उमेदवार असल्याचा डांगोरा पिटायचा अन् दुसरीकडे आघाडीचा धर्म विसरायचा. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर येथे गुरुवारी झालेल्या जाहीर सभांच्या जाहिरातींमध्येही राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे व नावे वगळली आहेत. मोहोळ, उत्तर सोलापूर व मंगळवेढा तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद भक्कम आहे. आमच्या पक्षाचे नेते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिंदेंचा प्रचार करीत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष कृषिमंत्री पवार यांनी शिंदेंच्या प्रचाराचा स्वत: शुभारंभ केला. राष्ट्रवादीच्या नेत्याने दाखविलेल्या दातृत्वाचा आदर्श मित्रपक्षाने घ्यावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष डॉ. बसवराज बगले यांनी सांगितले.


वस्तुस्थिती खरी, सुधारणांची अपेक्षा : गादेकर
काँग्रेसने तयार केलेल्या काही प्रचार रथांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छायाचित्रे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी ते माझ्या निदर्शनास आणून दिले आहे. त्याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांना तातडीने बदल करण्यास कळविले आहे. आमच्या सूचनांची काँग्रेसचे नेतेमंडळी दखल घेऊन सुधारणा करतील, अशी अपेक्षा आहे. पक्षप्रमुख पवार यांनीच स्वत: प्रचारसभा, बैठका घेऊन एकत्रित काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे नावं व छायाचित्रे नसणे हा किरकोळ मुद्दा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी सांगितले.