आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या स्थापनादिनी दिसणार गटबाजीचे प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस शनिवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त होणार्‍या कार्यक्रमातच गटबाजीचे प्रदर्शन दिसून येऊ लागले आहे. शहर उत्तर मतदार संघात होणार्‍या मेळाव्यात शहरातील प्रमुख काँग्रेसचे नेते उपस्थित राहत असताना गेल्यावेळी शहर उत्तरमध्ये विधानसभा निवडणूक लढविणार्‍या महेश कोठे व ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांचा उल्लेख प्रमुखांच्या यादीतून टाळला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

एकीकडे पूर्व भागातील पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या वादातून कोठे-विरुद्ध कारमपुरी असा सामना रंगला आहे, तर इकडे युवक काँग्रेस, सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमालाही राजकीय गटबाजीचा रंग आला आहे. काँग्रेस स्थापना दिनादिवशीच ही गटबाजी समोर येऊ लागल्याची चर्चा रंगली आहे.

काँग्रेसची जाहीर सभा शनिवारी सायंकाळी सात वाजता टिळक चौक येथे होणार आहे. आमदार प्रणिती शिंदे, दिलीप माने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, चिटणीस सुधीर खरटमल, शहराध्यक्ष धर्मा भोसले, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आदी मार्गदर्शन करणार आहेत.

जाहीर सभेस काँग्रेस पक्षाचे सर्व समन्वय समिती, महापौर व महापालिका अधिकारी, नगरसेवक आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदित्य दायमा यांनी केले आहे.

शहर उत्तरसाठी आहे अनेक इच्छुकांत स्पर्धा
शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महापालिकेतील सभागृहनेते महेश कोठे, चंद्रकांत दायमा आदी इच्छुक आहेत. त्यांच्यात उमेदवारी मिळवण्याची स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यामुळेच वेगवेगळे कार्यक्रम आखले जात आहेत. महेश कोठे यांनी शास्त्रीय संगीत महोत्सव घेऊन त्याची झलक दाखवून दिली. त्यानंतर (कै.) बाबूराव चाकोते यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन करून चाकोते यांनीही शक्तिप्रदर्शन घडवून आणले. आणि आता दायमा यांच्या नियोजनाखाली काँग्रेसची सभा होत आहे.