आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेत्यांचा विरोध पाहता आमदार मानेच अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर - काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष ज्यांच्यासोबत कार्यक्रमाला जात नाहीत. त्यांनी शिवसेना संपल्याची भाषा करू नये. आमदार दिलीप माने यांना आगामी विधानसभेत पराभूत करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात आहेत. वेळ येताच आमचा उमेदवार आम्ही जाहीर करू, असा खळबळजनक दावा शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना केला.

माळकवठे येथील कार्यक्रमात आमदार माने यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवसेना संपली आहे. त्यामुळे ही जागा रिपाइंला सुटणार असल्याचे विधान केले होते. त्या विषयी ठोंगे-पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात शिवसेना मजबूत आहे. सोलापूरच्या हद्दवाढ भागात आमचे आठ नगरसेवक आहेत. उत्तर सोलापूरच्या तिर्‍हे भागातील आठ ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही काम करीत आहोत. शिवसेना संपल्याचे आमदार माने भान हरवून बोलत आहेत. ते एक जबाबदार नेते आहेत, त्यांना हे शोभत नाही. आमदार म्हणून त्यांनी सोलापूरच्या हद्दवाढ भागात व दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात काम केले नाही. त्यामुळे अपयश त्यांना दिसत आहे. काँग्रेस नेत्यांना व पक्षाला अगोदर त्यांनी सावरावे. भाजप, शिवसेना व रिपाइंची आमची महायुती आहे. ‘दक्षिण’ची जागा रिपाइंला सुटण्याची भाषा म्हणजे त्या पक्षाला कमी लेखण्या जोगे आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना काँग्रेसचा पराभव करून या तालुक्यात पुन्हा भगवा फडकेल, याचा आम्हाला विश्वास आहे.’ दरम्यान, या राजकीय टोलेबाजीने निवडणुकीचे रंग आतापासूनच भरू लागले आहेत.