आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्रुपीकरण : मैदान आहे की अजोर्‍याचे ठिकाण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील प्रमुख असलेल्या होम मैदानावर अजोरा टाकण्यात आला आहे. - Divya Marathi
शहरातील प्रमुख असलेल्या होम मैदानावर अजोरा टाकण्यात आला आहे.
सोलापूर - शहरात ठिकठिकाणच्या मैदानांवर अजोर्‍याचे ढिगारे जमा होतच आहेत. शहर विद्रूप करणार्‍यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नाही. नगरसेवकही या विषयावर गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे खेळाची मैदाने अजोर्‍याची ठिकाणे बनली आहेत.

शहर विस्तारत आहे. ठिकठिकाणी घरे आदी इमारतींचे बांधकाम सातत्याने सुरू आहेत. त्यातून निघणारा अजोरा टाकण्यासाठी लोकांकडून जवळच्या मैदानांची निवड केली जात आहे. अजोर्‍याची ढिगारे साठून आहेत. त्यामुळे खेळासाठी मैदान उरलेले नाही. शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे मुले खेळण्यासाठी मैदानावर गर्दी करत आहेत. मात्र, तेथील मातीच्या ढिगार्‍यांमुळे मैदान संकोचले आहे. मोकळेपणाने खेळणे शक्य होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

येथे टाकला जातो अजोरा
होम मैदान, सात रस्ता येथील होमगार्ड मैदान, विजापूर रोडवरील स्मृती उद्यान समोरील मैदान, कर्णिक नगर येथील हवामान खात्याच्या मागील बाजूचे मैदान, जय भवानी शाळेचे मैदान, तुळजापूर रोड, महापालिका दोन नंबर झोन कार्यालयाच्या मागील बाजूस.

अजोर्‍याचा वापर करता येईल
बांधकामाच्याठिकाणाहून अजोरा उचलण्यासाठी महापालिकेने सशुल्क यंत्रणा राबवावी. जमा अजोर्‍याचा योग्य वापर महापालिकेस करता येईल. शहरात अनेक ठिकाणी सखल भाग असल्याने पावसाळ्यात पाणी साठून दलदल माजते. तेथे आवश्यकतेप्रमाणे या अजोर्‍याचा उपयोग करून घेता येईल.

सापडल्यास कारवाई करू
मैदानावर अजोरा टाकताना सापडले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आहेत. रात्री टाकतात. त्यामुळे सापडत नाही. त्यांच्यावर कारवाई करताना अडचणी येत आहेत. दिवसा आढळले तर झोनमार्फत कारवाई केली जाते.”- गंगाधर दुलंगे, नगर अभियंता, महापालिका

होम मैदानावर अजोरा
गुरुवारीमहापालिकेच्या होम मैदानावर काही मक्तेदारांनी दोन डंपर अजोरा टाकला. महापालिका झोन अधिकारी, मनपा भूमी मालमत्ता अधीक्षक आणि आराेग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आगामी काळात होम मैदानसह शहरातील इतर मैदाने अजोर्‍याने भरतील.

महापालिकेस भुर्दंड
अजोराटाकल्यावर ते उचलण्यासाठी महापालिकेस प्रतिटन ६६७ रुपये आर्थिक भार सोसावा लागतो. बांधकाम परवाना देताना अजोरा टाकण्याची व्यवस्था आदीबाबत कठोर नियम करण्याची गरज आहे. अजोरा टाकण्यासाठी पर्यायी जागा सुचवली पाहिजे.

खेळायचे कोठे?
मैदानावरअजोरा टाकल्यास उन्हाळ्यात लहान मुले खेळण्यासाठी असलेल्या जागा कमी होत असल्याचे दिसून येते.