पंढरपूर- झेंडूजीबुवा मठाचे लवकरच नव्याने बांधकाम केले जाणार असून कामाला प्रारंभ राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे आश्वासन महसूल कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले. श्री. खडसे यांचा मंत्रिपद मिळाल्याबद्दल (वै.) झेंडूजी बुवा महाराज बेळीकर मठात सपत्नीक सत्कार झाला. मंदाकिनी खडसे, नगराध्यक्षा साधना भोसले, दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, सीईओ सुरेश काकाणी, पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्री. खडसे म्हणाले, पंढरपूरचा सुनियोजित आराखडा तयार करून विकासाचे नियोजन करण्यात येणार आहे. चंद्रभागेतील प्रदूषण रोखण्यासह शहरातील विविध मठांमध्ये शंभर टक्के अनुदानावर शौचालये केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गुरुवर्य राजारामशास्त्री महाराज यांच्या हस्ते तसेच पंढरपूर नगरपालिका मठाच्या विश्वस्तांच्या वतीने श्री. खडसे यांचा तर मंदाकिनी खडसे यांचा सत्कार पद्मजादेवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी राजारामशास्त्री महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी दिंडीचालक श्री यादव महाराज आदी उपस्थित होते.