आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षतोडीकडे पालिकेचे होतेय दुर्लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ड’ वर्ग महापालिका असलेल्या सोलापूर शहरात पर्यावरणीय समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात दररोज वृक्षतोड होत असताना पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. वृक्ष जतन अधिनियम 1975 च्या कायद्यानुसार पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. पालिकेने मात्र अद्यापही या समितीची स्थापना केलेली नाही. या उलट मलईदार समित्यांच्या स्थापनेकडेच पालिकेचा कल असल्याचे दिसून येते.
ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येमुळे जागतिक पातळीवर पर्यावरण संतुलनाच्या दिशेने महत्त्वाच्या उपायांची अंमलबजावणी केली जात आहे. शहरात पालिकेतर्फे व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड आवश्यक आहे. मात्र, वृक्ष लागवड न करताच अस्तित्वातील वृक्षांवरही कुर्‍हाड चालवली जात आहे. पालिका प्रशासनाकडून वृक्षतोडीला परवानगी मिळतेच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरात नवीन वृक्ष लागवडीची मोहीम राबवण्यापेक्षा आहे त्याच वृक्षांचे जतन करणे गरजेचे आहे.


काय आहेत नियम
वृक्ष जतन अधिनियम 1975 नुसार पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करणे बंधनकारक, समितीत नगरसेवक, वृक्षप्रेमींची निवड करावी, महिन्यातून एकदा समितीची बैठक घेण्यात यावी.


सर्वेक्षणही झाले नाही
महापालिकेने शहरातील वृक्षांचे सर्वेक्षण करून रंगरंगोटी करणे आवश्यक आहे. पण, अद्याप त्याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. महापालिकेचे नगरसेवक, वृक्षप्रेमींचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.


वनाचा प्रकार
उष्ण कटिबंधीय काटेरी झाडेझुडपे विखुरलेल्या स्वरूपात. बहुतांश काटेरी वनस्पती. त्यामध्ये प्रामुख्याने बोर, नीम, हिवर, बाभूळ, चिंच, खैर, अंजन असे वृक्ष तर, मारवेल, पवन्या, शेडा, कुसळी या प्रजातींचे गवत.

आयुक्तांकडेच नाही प्राधिकरणाबाबत माहिती
मी माहिती घेऊन सांगतो..
महापालिकेत वृक्षप्राधिकरण अस्तित्वात आहे का? याबाबतची माहिती खुद्द पालिका आयुक्त अजय सावरीकर यांनाच नव्हती. प्राधिकरणाबाबत विचारणा केली असता, मला त्याबाबत माहिती नसून तुम्ही उद्यान अधीक्षकांकडे चौकशी करा, असे सांगितले. दरम्यान, उद्यान अधीक्षक मदन कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा मोबाइल स्विच ऑफ होता.

शहरात पाच लाख वृक्षांची नोंद
शहर आणि हद्दवाढ भागात मिळून पाच लाख 7524 वृक्ष असल्याची नोंद महापालिका उद्यान विभागाकडे आहे. 1996 मध्ये करण्यात आलेल्या गणनेनुसारची ही संख्या आहे. त्यानंतर शहरातील वृक्ष मोजण्याचा सोपस्कार पाळला गेलेला नाही. गावठाण भागात 66 हजार 239 वृक्ष आहेत. हद्दवाढ भागात जवळपास साडेचार लाख वृक्ष आहेत. केगाव परिसरात सरकारी जागेत सर्वाधिक तीन लाख 70 हजार 268 वृक्ष आहेत. शहराची लोकसंख्या पाहता दोन व्यक्तीमागे एक झाड अशी गणना आहे. महापालिकेतील आकडेवारीनुसार सन 2011-12 या वर्षात एकही झाड पालिकेने तोडले नसल्याची नोंद उद्यान विभागाच्या दप्तरी आहे.


वृक्ष प्राधिकरण समितीची कार्ये
* शहरातील वृक्षांचे रक्षण, जतन
* दर पाच वर्षांनी वृक्षांची गणना
* वृक्षतोडीच्या अर्जानंतर पाहणी
* नोटीस देऊन हरकती मागवणे
* एकास तीन प्रमाणात वृक्षलागवड