आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Corporation Officers Want Commission In Mid Day Milea

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा पदाधिकार्‍यांना हवे खिचडीत कमिशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका शाळांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2012 या तीन महिन्यांत वाटप केलेल्या खिचडीच्या बिलात मनपा पदाधिकारी 15 टक्के कमिशन मागत असल्याची बाब पुढे आली आहे. एका लिपिकाने स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र पाठवून संबंधित लिपिकाकडे कमिशनची मागणी केली. ते पत्र पुरावा म्हणून विधानसभेत सादर करून आमदार विजयकुमार देशमुख यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर शासनाने महापालिका शिक्षण मंडळाकडून खुलासा मागवला आहे.

22 केंद्रांच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार वाटप केला जातो. दर महिन्याच्या तीन तारखेस तांदूळ मागणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांकडे केली जाते. पहिली ते पाचवीतील प्रति विद्यार्थ्यास प्रतिदिन अन्न शिजवण्यासाठी तीन रुपये दोन पैसे दिले जाते, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चार रुपये 47 पैसे दर बचत गटास दिला जातो.

ऑक्टोबर महिन्यात खिचडी अनुदानापोटी 83 लाख 70 हजार 218, तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांसाठी एक कोटी 64 लाख 55 हजार 82 रुपये अनुदान प्राप्त झाले. ते संबंधित शाळेस वाटप करण्यात आले आहे.
तीन महिन्यांची रक्कम वाटप करताना त्यातील 15 टक्के रक्कम पदाधिकार्‍यांनी मागणी केल्याचे उघडकीस आल्याने आमदार देशमुख यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. तीन महिन्यांच्या बिलापैकी 15 टक्केप्रमाणे 86 हजार 550 रुपयांची मागणी करणारे पत्र विधानसभेत सादर करण्यात आले.

असे वाटप केले जाते दरमहा अनुदान
मनपा शाळा 2.66 लाख
खासगी प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी 29.95 लाख
खासगी प्राथमिक शाळा सहावी ते सातवी 6.56 लाख
माध्यमिक शाळा पाचवी 3.53 लाख
माध्यमिक शाळा सहावी ते आठवी 23.29 लाख
स्वयंपाकी अनुदान 60 हजार