आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका बजेट सभा दोन दिवस !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - प्रतिवर्षी 31 मार्च या एकाच दिवशी होणारी महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा यंदा 30 आणि 31 मार्च असे दोन दिवस होणार आहे. 30 मार्च रोजी सकाळी 11 वा. सभेला सुरुवात होईल, अशी माहिती महापौर अलका राठोड यांनी दिली. या निर्णयाचे नगरसेवक, माजी नगरसेवक आणि सर्वपक्षीय गटनेत्यांनी स्वागत केले.

राज्यातील सर्व महापालिकांच्या अर्थसंकल्पीय सभा 31 मार्चपूर्वीच होतात. सोलापूर महापालिकेतील पदाधिकार्‍यांकडून 31 मार्च रोजी एकच सभा घेतली जात होती. एकच दिवस सभा होत असल्याने अनेक विषयांवर चर्चा होत नव्हती. ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भात चर्चा घडवून आणली.

या चर्चेत ज्येष्ठ नेते, विविध पक्षांचे अध्यक्ष यांनी सहभाग नोंदवून महापालिकेची सभा दोन दिवस व्हावी, यावर एकमत दर्शविले. 21 मार्च रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत 773 कोटींचा बजेट मंजूर होऊन सभागृहाकडे आले आहे. शुक्रवारी सायंकाळी महापौर अलका राठोड यांनी आपल्या दालनात गटनेत्यांची बैठक बोलावली. त्यात माजी महापौर अँड. यू. एन. बेरिया, मनोहर सपाटे, आरिफ शेख, विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर, राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे, भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील, प्रा. अशोक निंबर्गी, बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसचिव ए. ए. पठाण आदी उपस्थित होते.


महापौरांनी अर्थसंकल्पीय सभेविषयी सर्वपक्षीयांची मते जाणून घेतली. सर्वपक्षीयांनी दोन दिवस सभा घेण्यास अनुमती दर्शवली. महापालिकेच्या बजेटवर सविस्तर चर्चा होईल. महिला सदस्यांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागणार नाही, शिक्षण मंडळ आणि परिवहन समितीच्या तरतुदींविषयी चर्चा होईल. त्यामुळे अर्थसंकल्पीय सभा दोन दिवस घ्यावी, अशी सूचना सर्वांनी केली. त्यानंतर महापौरांनी 2013-14 या आर्थिक वर्षाची सभा दोन दिवस होईल, असे जाहीर केले.


कार्यक्रम पत्रिका आज जाहीर होणार
महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा दोन दिवस घेण्याच्या दृष्टीने 23 मार्च रोजी कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करणे आहे. त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्याचे आदेश महापौर राठोड यांनी दिले आहेत.


कोट
सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय
दोन दिवस सभा घेण्याचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन घेण्यात आला आहे. पक्षीय बलाबलानुसार सदस्यांना बोलण्यासाठी वेळ ठरवून देण्यात येईल. बजेटवर सविस्तर चर्चा व्हावी यासाठीच दोन दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे.अलका राठोड, महापौर


सविस्तर चर्चा होईल
महापौर राठोड यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. नगरसेवकांना अर्थसंकल्प समजून घेता येईल. महिला महापौर म्हणून त्यांनी महिला सदस्यांच्या भावना जाणून योग्य निर्णय घेतला आहे.
रोहिणी तडवळकर, विरोधी पक्षनेत्या


आम्ही आग्रही होतो
बजेट सभा दोन दिवस घ्यावी या मताशी मी ‘दिव्य मराठी’ मध्ये झालेल्या पहिल्या चर्चेपासून आग्रही होतो. यावर महापौर, सभागृह नेते महेश कोठे यांच्याशी मी सतत चर्चा केली.
अँड. यू. एन. बेरिया, नगरसेवक


योग्य निर्णय
दोन दिवस बजेट सभा घेण्याचा निर्णय महापौर राठोड यांनी घेतल्याने त्याचे स्वागत करतो. बजेटमध्ये सविस्तर चर्चा होईल.सुरेश पाटील, नगरसेवक, भाजप


मी आग्रह धरला होता
बजेट सभा दोन दिवस घेतल्यास फायदा होईल. मी आग्रह धरला. महापौरांनी योग्य निर्णय घेतला. त्यांचे मी अभिनंदन करतो.
मनोहर सपाटे, नगरसेवक