आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार, दर्जाहीनता खपवून घेणार नाही : आयुक्त देशमुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - पंढरपूर, देहू, आळंदी व भंडारा डोंगर या तीर्थक्षेत्रांमधील विकासकामे पारदर्शकपणे पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करत विभागीय आयुक्त विकास देशमुख यांनी या कामांमध्ये भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा खपवून घेणार नाही, अशी तंबी अधिकार्‍यांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौर्‍यानिमित्त ते शनिवारी सोलापुरात आले होते. रविवारी त्यांनी येथील तीर्थक्षेत्र विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आयुक्त देशमुख म्हणाले, ‘पंढरपूरसह विभागातील तीर्थक्षेत्र विकासाची कामे प्रगतिपथावर आहेत. येथील कामांविषयी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा झाली आहे. आठ दिवसांपूर्वी सर्वच तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांचा आढावा घेतला आहे.

तीर्थक्षेत्रांमधील स्थानिक आणि भाविक या दोहोंचा विचार करून विकासकामे केली जातील. सध्या चंद्रभागा नदीवर जुन्या दगडी पुलाशेजारी बांधण्यात येणार्‍या पुलाचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल. विष्णुपदाजवळील बंधार्‍याचे कामही लवकरच सुरू केले जाईल.’ या वेळी प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार गजानन गुरव, मुख्याधिकारी शंकर गोरे उपस्थित होते.
धर्मशाळांतही उभारणार शौचालये
शहरातील कायमस्वरुपी शौचालयांच्या कामांची माहिती घेतली आहे. शासनाच्या शंभर टक्के अनुदानातून मठ, धर्मशाळांमध्ये शौचालयांची कामे लवकरच हाती घेतली जातील. मात्र, शहरातील एकूण मठ, धर्मशाळांपैकी केवळ 30 टक्के मठ, धर्मशाळा यांची पालिकेकडे नोंदणी आहे. उर्वरित मठ, धर्मशाळांचीही नोंद करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
‘तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत वाखरी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी तळांची जमीन लवकरच संपादित करू. तेथे कायमस्वरुपी सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच शहरात सुरू असलेली कामे कोणत्या योजनेतून, किती रुपयांची, ती पूर्ण करण्याची मुदत, तक्रारीसाठी संपर्क याची माहिती असलेले फलकही त्वरित लावले जातील,’ असे आयुक्त देशमुख यांनी सांगितले.