आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर यात्रेतील अस्वच्छतेविषयी याचिकेवर उद्या होणार निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पंढरपुरातील यात्रांच्या काळात होणा-या अस्वच्छतेप्रकरणी दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात 3 जुलै रोजी निर्णय होणार आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्हा प्रशासन, नगरपालिका व वारकरी साहित्य परिषदेने प्रतिज्ञापत्र सादर केले.

पंढरपूर यात्रेदरम्यान सफाई कामगारांना कराव्या लागणा-या मानवी विष्ठेची वाहतूक आणि त्यासंबंधीच्या कायद्याच्या उल्लंघनासंबंधी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती कामदार यांच्यासमोर सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने पंढरपूर वारीदरम्यान होणा-या अस्वच्छतेचा मुद्दा उचलून धरला. तसेच सरकार भाविकांसाठी स्वच्छतागृहांची का व्यवस्था करत नाही, असा सवाल विचारला होता. तसेच जिल्हाधिकारी, नगरपालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते.

जिल्हा प्रशासनाने प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या वाळवंटात तात्पुरत्या शौचालयाची उभारणी, त्यासाठी विद्युतपंपाद्वारे पाणीपुरवठा आदी विविध चांगल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्यास अस्वच्छतेमुळे होणारा त्रास बराच वाचणार असल्याचे न्यायालयाने म्हटले. जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरात तात्पुरते शौचालय उभारण्यास जागा अपुरी असल्याने रेल्वे व राज्य मार्ग परिवहनने जागा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली होती. परंतु रेल्वे प्रशासनाकडून उपस्थित नव्हते. एसटीच्या वकिलांनी 100 तात्पुरते शौचालय उभारण्यास जागा देण्याचे मान्य केले.

न्यायालयाने भाविकांच्या पंढरपूर शहरातील प्रवेशाच्या ठिकाणापासून ते कुठे उतरतात तेथे स्वच्छताविषयक व्यवस्था असायला हवी, असेही सांगितले. न्यायालयाने याप्रश्नी वारक-यांचीही जबाबदारी असल्याचे म्हटले होते. परंतु वारकरी, फडकरी संघटनेचे कोणीही न्यायालयात आले नाहीत. वारकरी साहित्य परिषदेने स्वयंसेवकांच्या माध्यमातून वारीत स्वच्छताविषय जागृती करणार असल्याचे न्यायालयात सांगितले. यावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता 3 जुलै रोजी यावर न्यायालय निर्णय देणार आहे.
फोटो - डमी पिक