आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुरियरच्या पैशांची लूट; 2 अटकेत, सात जणांचा शोध सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नातेपुतेजवळ बस अडवून कुरियरचे पैसे लुटणार्‍या टोळीतील दोघांना ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पकडले. आकाश गणपत जाधव (वय २३, रा. बीमवी, जावळी, सातारा), राजेश सुभाष जवळ (वय २३, रा. जवळवाडी, ता. जावळी, सातारा) यांना अटक झाली असून, २० लाख, ६० हजार रुपयेही जप्त करण्यात आले. अन्य सातजण गायब आहेत. प्रशांत काटे (रा. निमसाखर, इंदापूर) यांनी नातेपुते पोलिसांत फिर्याद दिली होती.

मंगळवेढा-कुर्ला बसमधून कुरियरचे पैसे नेत असल्याची टीप पुणे, सातारा चोरांच्या टोळीला मिळाली होती. आठ दिवस पाळत ठेवून २७ एप्रिलला त्यांनी लूट फत्ते केली. माळशिरस-नातेपुते मार्गावर बस येताच बहिणीला दोघांनी पळवल्याचा बहाणा करून कुरीयर कंपनीच्या दोघांना बसमधून उतरवले. त्यांच्याजवळील पैसे हिसकावून इंदापूर सराफवाडीजवळ सोडले होते.

बहिणीला पळवल्याचा बहाणा
शिवकृपा कुरीयरच्या सोलापूर शहर, जिल्ह्यासह अनेक ठिकाणी शाखा आहेत. घटनेदिवशी पंढरपूर सोलापूरमधून संतोष पवार, प्रशांत रणवरे हे दोघे पंढरपूरहून कुर्ल्याला जात होते. पंढपूरमध्येच सहाजण बसले. संधीची वाट पाहत होते. माळशिरस-नातेपुते मार्गावर बस येताच सहाजणांनी गोंधळ सुरू केला. एकाने चालकाला चाकूचा धाक दाखवला. पवार, रणवरे या दोघांना पकडून, यांनी बहिणीला पळवले असे म्हणत गच्ची पकडून त्यांना खाली उतरवले. पाठीमागून येणार्‍या क्वॉलिस गाडीतून इंदापूरजवळ हातपाय बांधून सोडले. बसच्या चालक-वाहकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

दोघांना ताब्यात घेतले आहे. पळून गेलेल्या सात जणांचा शोध सुरू आहे. वीस लाख रुपये जप्त केलेत. एकूण पैसे किती होते, टोळीचे रेकॉर्ड काय तसेच कुरियर कंपनीची चौकशी करण्यात येत आहे. नियोजन करून टोळीने काम केले आहे. सूत्रधाराचा छडा लावू .'' दत्तात्रयमंडलिक, पोलिस अधीक्षक

सातारा जिल्ह्यातील रेकॉर्ड कामी
अशापद्धतीने गुन्हे करणारी टोळी कुठली आहे, याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन कौसडीकर त्यांचे पथक घेत होते. सातारा जिल्ह्यातील रेकॉर्डवरील टोळीची माहिती मिळाली. त्यांच्या मागावर असताना गुन्ह्यात वापरलेली कॉलीस गाडी मिळाली. चौकशी करताना आकाश राजेश जाळ्यात अडकले. वीस लाख, साठ हजार रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई फौजदार संदीप चव्हाण, सहायक फौजदार तिपण्णा दुधाळे, हवालदार गोरखनाथ गांगुर्डे, विजयकुमार पावले, प्रेमेंद्र खंडागळे, नारायण गोलेकर, मोहन मनसावले. व्ही. एस. मोरे, सचिन मागाडे, सचिन ननवरे, केशव पवार या पथकाने केली.