आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्माधिष्ठित राजकारण कल्याणाचे नसते, माकप खासदार मोहंमद सलीम यांचा 'एमआयएम'ला टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लोकांचेप्रश्न सोडवण्यासाठी प्रतिनिधी निवडून देण्याच्या प्रक्रियेला राजकारण म्हटले पाहिजे. त्याला कुठल्या जाती-धर्माचा शिक्का बसला तर ते कुणाच्याही हिताचे नसते. उलट समाजात तेढ निर्माण होते. एकात्मता धोक्यात येते. विचारवंत मंडळी अशा पक्षांना थारा देत नाहीत, असे पश्चिम बंगालचे माकप खासदार मोहंमद सलीम यांनी रविवारी येथे सांगितले. भाजप, शिवसेना आणि 'एमआयएम' हे पक्ष त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या प्रचारासाठी ते सोलापूरला आले. सकाळी पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रात अनेक घोटाळे करून ठेवले. तरीही पुन्हा सत्ता हाती येईल, या लालसेने त्यांना पछाडले. त्याच इर्षेने आघाडी तोडली. त्यांचे पाहून भाजप-शिवसेनेची युती तुटली. लुटालुटीचे राजकारण थांबवायचे असेल तर स्वच्छ प्रतिमेच्या आणि धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराला निवडूण दिले पाहिजे. भाकपचे ज्येष्ठ नेते रा. गो. म्हेत्रस यांनी स्वागत केले.

खासदार सलीम म्हणतात...
ईस्टइंछिया कंपनी गेली आता अंबानी, अदानी भांडवलदारांच्या पैशांवर केंद्रातील सरकारे बनत आहेत. त्यामुळे अशा सरकारांना देशातील गरिबांशी काही देणे-घेणे नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश आले. आता अंबानी, अदानींच्या पैशावर सरकारे येत आहेत. काँग्रेसनेही त्यांची मदत घेतली आणि भाजपही त्यांच्याच पंक्तीला बसला. त्यामुळे देशातील गरिबांचे भवितव्य मात्र चिंतीत करण्यासारखे आहे.
अन्यथा गरिबांचे नुकसान
श्री.आडम यांनी सोलापुरातील गरिबांसाठी जे काम केले, त्याला तोड नाही. महागाईच्या खाईत लोटलेल्या गरिबांना दोनवेळचे जेवण मिळवणे जिकिरीचे असताना, त्यांना स्वमालकीची घरे देण्याचे मोठे काम केले. विडी कामगारांना १० हजार घरकुले बांधून दिली. आता आणखी २० हजार घरे प्रस्तावित आहेत. अशा स्थितीत त्यांना निवडून देणे गरजेचे आहे. अन्यथा, गरिबांचे खूप मोठे नुकसान होईल, असेही सलीम म्हणाले.