सोलापूर - आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे दिंडूरेवस्तीवर संशयित चोराचा मृत्यू फेफर्यामुळे नसून मारहाणीत झाला आहे. त्यासंदर्भात पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घडली होती. त्याची ओळखही पटली असून तो ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. चंद्रकांत आनंता दिवे (वय 25) असे नाव आहे.
लक्ष्मण शिवशरण दिंडूरे (वय 35), हमणंत रामचंद्र दिंडूरे (वय 29), योगीनाथ संगमेश्वर दिंडूरे (वय 28), केदरनाथ दिंडूरे (वय 39), नरसप्पा दिंडूरे (वय 41, रा. सर्वजण आहेरवाडी) यांना अककलकोट न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. चंद्रकांत व त्याचे तीन साथीदार दिंडूरेवस्तीवर चोरी करण्यासाठी गेले होते. तेथे लोकांनी चंद्रकांतला पकडून मारहाण केली. अन्य तिघेजण पळून गेले. छातीवर व बरगडीवर गंभीर मारहाण झाल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे चंद्रकांतचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.