आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मगर सोडली जलाशयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महात्मा गांधी प्राणी संग्रहालय परिसरातील नाल्यातून पकडलेली मगर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली. पकडल्यापासून ती काहीही खात नव्हती. त्यामुळे वन विभागाने तिला निसर्गात सोडण्याचा निर्णय घेतला. अर्थात हा भाग जलाशयाचाच असून ठिकाण मात्र, गुप्त ठेवण्यात आले आहे.

नोव्हेंबरच्या 7 तारखेला काही युवकांनी नाल्यातून मगर पकडली होती. त्यानंतर तिला प्राणी संग्रहालयातील एका लहानशा हौदात ठेवण्यात आले होते. तेव्हापासून ती काहीच खात नव्हती. पकडल्यामुळे ती भेदरलेली होती. तसेच निसर्गात मुक्त राहण्याची सवय यामुळे ती काहीही खात नव्हती. 13 नोव्हेंबरला जिल्ह्यातील एका जलाशय असलेल्या निर्धोक परिसरात सोडण्यात आले. हौदातून बाहेर काढताना मगरीने चावा घेतल्याने वनमजूर दत्तात्रय ठोंबरे गंभीर जखमी झाले.

मगर सांभाळण्याची जबाबदारी महापालिका उद्यान विभागप्रमुख डॉ. सुहास लांडगे यांनी घेतली होती. त्यासाठी वनविभागाकडून कागदपत्रांसह ताबा मागितला होता. त्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यात आली. प्राणी संग्रहालयात तिला मटन, मासे घालण्यात आले. पण, तिने खाल्लेच नाही. डॉ. लांडगे यांनी 11 नोव्हेंबरला वनविभागाला पत्र लिहून मगर परत घेण्याची विनंती केली. वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांच्याकडे परवानगी घेऊन तिला निसर्गात सोडण्यात आले.

जलाशयात मुक्त केली
आठ दिवसांपासून खाल्ले नसल्याने उद्यान विभागप्रमुख डॉ. सुहास लांडगे यांनी मगरीचा ताबा परत दिला. उपवनसंरक्षकांनी वरिष्ठ कार्यालयाकडून मगरीला निसर्गात मुक्त करण्याची परवानी मिळवली. त्यानुसार 13 नोव्हेंबरला रात्री उशिरा ती मगर जिल्ह्याच्या बाहेरील एका जलाशयात मुक्त केली.’’ दादासाहेब हजारे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सोलापूर

उद्यान विभागाचे दुर्लक्ष
मगरीला पकडल्यानंतर तिची आरोग्य तपासणी करण्याकडे उद्यानविभागाने सोईस्कर दुर्लक्ष केले. वन्यजीवप्रेमींनी त्याबाबतची चौकशी केली असता मगर तणावामध्ये असल्याचे कारण पुढे केले. मगरीला सोडण्यापूर्वीही तिचे वजन, वय व लांबीची मोजणी करण्यात आली नाही. तसेच, ती नाल्यात आढळली, मगर आली कुठून याचा तपास लावण्यासाठी उद्यानविभागाच्या ताब्यातील नर व मादी मगरींबरोबर डीएनए टेस्ट केली नाही.