आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुळजाभवानी मंदिराचे दैनंदिन उत्पन्न ६ लाखांच्यावर, २० कोटींवर गेले उत्पन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी सामान्य भक्तांची माता मानली जाते. मात्र, सामान्य भक्तांकडून मातेला देणगी देण्याचे प्रमाण आता दररोज ६ लाख म्हणजे वर्षाकाठी २० कोटींवर गेले आहे. मंदिरात मिळू लागलेल्या सुविधा आणि भाविकांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे अगदी १० ते १२ वर्षांत उत्पन्नातही ७ ते ८ पटींनी वाढ झाली आहे.

तुळजाभवानी मातेच्या ऐतिहासिक नगरी तुळजापूरमध्ये भाविकांची संख्या वाढतच आहे. शारदीय नवरात्रोत्सव, शाकंभरी महोत्सवाप्रमाणेच चैत्री यात्रा, उन्हाळा आणि दिवाळी सुट्यांमध्ये तुळजापुरात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. वाढत्या गर्दीमुळे दानपात्रातील दान वाढत आहे. २००१-०२ मध्ये देवीच्या दानपात्रात २ कोटी ८७ लाख ६४ हजार १२१ रुपये जमा झाले होते. २०१० मध्ये दानपेट्यांचा लिलाव बंद केल्यानंतर उत्पन्नात मोठी वाढ झाली.

सहा कोटी व्याज
तुळजाभवानी मातेला दिलेली देणगी राष्ट्रीयीकृत बँकेत मंदिर संस्थानच्या नावाने ठेवली जाते. या देणगीतून मोठ्या प्रमाणावर व्याज मिळते. गेल्या तीन वर्षांचा विचार केल्यास मंदिर संस्थानला जवळपास १८ कोटींचे तर २०१४-१५ मध्ये ६ कोटी २२ लाख रुपये व्याज मिळाले आहे.

मंदिराच्या उत्पन्नाचे स्रोत
बँकांतील ठेवी, देणगी, दानपेटी, मनिऑर्डर, सिंहासन पेटी, लिलाव उत्पन्न, विविध विक्रीवरील उत्पन्न, विविध पूजेवरील आणि इतर बाबींवरील उत्पन्नातून मंदिर संस्थानला वर्षाकाठी सरासरी २० कोटी रुपये मिळतात.

खर्चही अर्धा कोटी
उत्पन्नाचे स्रोत मोजकेच असले तरी दर महिन्याला दीड कोटीचे उत्पन्न मिळविणाऱ्या मंदिर संस्थानचा खर्चही जवळपास ५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. मंदिराचे ८० कर्मचारी, सुरक्षारक्षक, स्वच्छता, देखभाल दुरुस्तीचा मोठा खर्च आहे. मंदिर संस्थानच्या वतीने सैनिकी शाळा चालविली जाते.

सिंहासन पेटीने वाढवले ३ कोटींचे उत्पन्न
मंदिर प्रशासनाच्या वतीने मुख्य दानपेटी असलेल्या सिंहासन पेटीचा दरवर्षी लिलाव केला जात होता. पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी या प्रक्रियेला लातूरच्या सहधर्मादाय आयुक्तांकडे आव्हान दिले. धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केल्यानंतर दानपेटी लिलावाचा गैरव्यवहार उघडकीस आला. त्यामुळे मंदिरातील दानपेट्यांची लिलाव प्रक्रिया बंद करण्याचे आदेश एप्रिल २०१० मध्ये आयुक्तांनी दिले. त्यामुळे लिलाव बंद करण्यात आला.

शिर्डीच्या साईबाबांचे उत्पन्न १ कोटींवर
तुळजाभवानी मातेला ऐतिहासिक वारसा असून प्राचीन असलेल्या मंदिराचे माहात्म्य विविधांगांनी जगासमोर आले आहे. मात्र, शिर्डीच्या साईबाबांच्या मंिदराचा इतिहास अलीकडच्या काळातील आहे. असे असले तरी साईबाबांना कॉर्पोरेट देव म्हणून ख्याती मिळाली आहे. सामान्यांबरोबरच उच्चभ्रू भाविकांचा देव असलेल्या साईबाबांच्या झोळीमध्ये दररोज सरासरी १ कोटीचे दान टाकले जाते. तुळजाभवानी मातेच्या झोळीमध्ये हे प्रमाण ६ लाखांपर्यंत आहे.
बातम्या आणखी आहेत...