आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- ‘राधा ही बावरी’, ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी’, ‘ओल्या सांझ वेळी उन्हे सावलीस बिलगावी’ अशा नव्या चालीच्या सुमधुर व मन तृप्त करणार्या गीतांनी सुप्रसिद्ध गायक व संगीतकार स्वप्नील बांदोडकर यांनी सोलापूरकरांवर शिंपले स्वर सुरांचे सुरेल चांदणे. निमित्त होते ‘दिव्य मराठी’च्या वर्धापनदिना निमित्त आयोजित ‘दिव्य मराठी उत्सव’ कार्यक्रमातील ‘मैफल सप्तसुरांची’ या कार्यक्रमाचे.
हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये सोमवारी कार्यक्रम रंगला. त्याची सुरुवात ये समा है, समा हैं ये प्यार का या सुजाता जोशी यांच्या गाण्याने करण्यात आली. गायक अंजनकुमार बोष यांनी ‘छु कर मेरे मनको किया तुने क्या ईशारा’ या गीताने बहारदार कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर नव्या चालीच्या असंख्य गाण्याचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. यात विकी डोनर चित्रपटातील पाणीदा तेरा रंग हे गीत सादर केले. कार्यक्रम रंगात आल्यानंतर स्वप्नील बांदोडकर यांनी मुंबई- पुणे- मुंबई चित्रपटातील का कळेना कसे कोणत्या क्षणी हरवते मन कसे हे.. गालावर खळी डोळ्यात धुंदी, तर प्रेमाची गोष्ट चित्रपटातील ओल्या सांजवेळी हे गीत सादर केले तर राधा ही बावरी या गीताने त्यांनी सबंध सभागृहात बसलेल्या प्रेक्षकांना बोलासह तालही धरायला लावले. या प्रत्येक क्षणांचा प्रेक्षकांनी गीतांचा मनमुराद आनंद घेतला.‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक संजीव पिंपरकर, युनिट हेड टिंकेश ग्यामलानी आदी उपस्थित होते. मंजूषा गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. ध्वनी संयोजन प्रकाश कासेगावकर यांनी केले.
अन् जमल्या राधा
बांदोडकर यांनी ‘राधा ही बावरी’ गीत सादर केले. त्यास वन्स मोअर मिळाला. त्यावर बांदोडकर म्हणाले, सभागृहात कुणी राधा आहे का जिला नृत्य करता येते? तेव्हा उत्साही तरुणींची लाटच जणू रंगमंचाकडे धावली. अन् मंचावर अनेक राधा जमल्या
बालचमूंनीही लुटला आनंद
एका गाण्यावर बाल मंडळींनी मंचावर येण्याचे आवाहन निवेदक पटेल यांनी केले. रावडी राठोड, डर्टी, दबंग या चित्रपटातील विविध धडाकेबाज गीतांवर बालचमूंनी बहारदार नृत्य केले. या वेळी बच्चे कंपनीशी अंजनकुमार व निवेदक पटेल यांनी गमतीजमती केल्या.
बांदोडकरांचा सोलापूरकरांना सॅल्यूट
स्वप्नील बांदोडकर यांना टाळ्या, नृत्य व वन्समोअरचा प्रतिसाद कार्यक्रमभर मिळत राहिला. ते पाहून बांदोडकरांनी आपण अनेक ठिकाणी कार्यक्रमास जातो, परंतु असे उत्साही प्रेक्षक पहिल्यांदाच पाहात असल्याने सोलापूरकरांना सॅल्युट करतो, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
ओसंडला उत्साह अन् आनंद
सभागृहात बांदोडकर यांनी प्रवेश केला त्या क्षणापासून ते त्यांच्या प्रत्येक गाण्याच्या सादरीकरणापर्यंत सर्व प्रेक्षकांचे हात हे टाळ्यासाठी वर होते अन् ओठांवर गीत. बांदोडकरांनी प्रेक्षकात जाऊन गीतांचे बोल प्रेक्षकांकडून म्हणवून घेतले. प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.