सोलापूर- नऊरात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. सोने लुटण्याचा. त्यासाठी बाजारात येतात
आपट्याची पाने. पूजेसाठी लागतात झेंडूची फुले. महाष्टमीच्या सायंकाळीच बाजारात त्यांचे आगमन झाले. शहर परिसरातून सुमारे 30 टन फुलांची आवक झाली. गुरुवारी सायंकाळी त्याचे दर होते 60 ते 80 रुपये प्रति किलो. आपट्याच्या पानांचा दर 10 रुपये जुगडा होता.
सीमोल्लंघनाने शुक्रवारी रात्री नवरात्रीची समाप्ती होईल. सायंकाळी पार्क चौकातील शमीच्या वृक्षाला देवीच्या मिरवणुका प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. तसे सकाळपासूनच सोने म्हणून आपट्याची पाने देणे-घेण्यास सुरुवात होते. दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच त्याची मोठी आवक झाली. मधला मारुती, टिळक चौक, बाळीवेस, कन्ना चौक, जोडबसवण्णा चौक, अशोक चौक आणि अंबाबाई मंदिराच्या परिसरात त्याच्या विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे.झेंडूची फुले लक्ष वेधत आहेत. देवीच्या मिरवणुकांना सजावटीसाठी याची खरेदी होते. सोबत आंब्याची पानेही घेतली जात आहेत. मधला मारुती परिसरात तर केळीच्या खुंटांचीही आवक झाली आहे.
दसरादरबारचे आयोजन
संभाजीआरमारतर्फे शुक्रवारी सकाळी १० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे दसरा दरबार आयोजिला आहे. त्याचे उद््घाटन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी नाकोडा ग्रुपचे चेअरमन बाबूभाई मेहता असतील. डॉ. शिवरत्न शेट्टे यांचे शिवरायांचे निष्ठावंत मावळे या विषयावर व्याख्यान होणार आहे, अशी मािहती आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी दिली. मधला मारुती येथे झेंडूची फुले आणि आपट्याची पाने घेण्यासाठी गुरुवारी अशी गर्दी होती.