आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजनांना विठ्ठल सेेवेच्या संधीचा संदेश देशभरात पोचवा- समितीचे अध्यक्ष डांगे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- येथील श्री विठ्ठल मंदिरातील परंपरागत हक्क अधिकाराच्या जोखडातून सर्वोच्च न्यायालयाने मुक्ती दिल्यामुळे बहुजनांसह महिलांना श्री विठ्ठल रुक्मिणीची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. ही मोठी अभिमानाची बाब आहे. ती सर्व देशभरात पोहोचावी, यासाठी अाजचा दिवस परिवर्तन दिन म्हणून साजरा करीत असल्याचे प्रतिपादन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी केले.
श्री विठ्ठल मंदिरावर १७ जानेवारी २०१४ रोजी शासनाची पूर्ण मालकी प्रस्थापित झाली. त्यानिमित्त मंदिर समितीच्या वतीने आयोजित दिवस परिवर्तन दिन समारंभात ते बोलत होते.
डांगे म्हणाले, “शेकडो वर्षांपासून मंदिरात बडवे, उत्पात आणि सेवाधारी मंडळी सेवा बजावत होती. त्यांच्या विरोधात भाविकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. मात्र, वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बडवे, उत्पात मंडळींची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे मंदिर खऱ्या अर्थाने शासनाच्या अधिपत्याखाली आले. गेल्या वर्षभरात मंदिर समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. त्यामुळेच समितीने भाविकांच्या सेवा-सोयीसाठीही मदतीचा हात पुढे केला. येत्या काळातही सर्वसामान्य भाविकांना केंद्रस्थानी मानून अधिकाधिक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहू.”
बद्रीनाथ महाराज तनपुरे, नामदास महाराज, ढवळीकर महाराज यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी भाविकांना जास्तीत जास्त सेवासुविधा मिळण्यासाठी मंदिर समितीने स्वत:कडील स्वनिधी कारणी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच महिला पुजाऱ्यांसह मंदिर समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, श्रीनिवास महाराज देहूकर, ज्ञानेश्वर महाराज ढवळीकर, अर्जुन धांडे, मंदिर समितीचे सदस्य वसंत पाटील, कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, व्यवस्थापक विलास महाजन, किरण घाडगे, संदीप मांडवे,मोहन अनपट, अंबादास शिंदे उपस्थित होते.