आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dayananda College Of Roads In The State Kumbhar Weiss

कुंभार वेस ते दयानंद महाविद्यालय रस्त्याची झाली दुर्दशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-दयानंद महाविद्यालय ते कुंभार वेस या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नवीन जलवाहिनी व ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी रस्ता खोदल्यानंतर पुन्हा रस्ता दुरुस्त न केल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.

कुंभार वेस व शेळगी परिसराला जोडणार्‍या या रस्त्यावरून जड वाहनांची मोठी वर्दळ आहे. शिवाय दयानंद महाविद्यालय, आसावा प्रशालेत जाणार्‍या विद्यार्थ्यांनाही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. यामध्ये अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी जखमी झाले आहेत. कुंभार वेस ही व्यापारी बाजारपेठ असल्याने मालवाहतूक करणारे वाहनही याचा मार्गाने जातात. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अनेकवेळा मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. मात्र याकडे महापालिका व संबंधित नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे.

ड्रेनेज लाइन व जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदला असला तरी दुरुस्ती झाली नाही. उताराचा रस्ता असल्याने रस्ता उखडला आहे. यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. याचा येथील स्थानिक दुकानदार व नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास होत आहे. जोडभावी पेठ पोलिस चौकीशेजारी व समोरच्या बाजूला व्यापारी गाळे असल्याने जड वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर आहे.

अपघाताची भीती वाढली

दयानंद महाविद्यालय ते कुंभार वेस मार्गावर खासगी प्रवासी वाहनांची संख्या मोठी आहे. खड्डय़ांमुळे आहे तो रस्ता अरुंद बनला आहे. खड्डे वाचवण्याच्या नादात अनेकवेळा लहान-मोठे अपघात झाले आहेत. यातूनच बुधवारी एका वृद्धास खासगी वाहनाने ठोकरल्याने जागीच मृत्यू झाला. तरीही महापालिकेने रस्ता दुरुस्तीविषयी कोणताही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. खड्डे बुझवण्याची मागणी होत आहे.

दुरुस्तीच्या कामाची प्रक्रिया सुरू..

या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम नगर अभियंता कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. रस्ता दुरुस्तीचे काम प्रस्तावित करण्यात आले असून यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. टेंडर प्रक्रियेनंतर हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. प्रकाश दिवाणजी, झोन अधिकारी क्रमांक 3.

अपघाताला निमंत्रण


गेल्या 6 महिन्यांपासून रस्त्याची अवस्था कठीण बनली आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहेत, मात्र याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. रस्त्यावर डांबरच शिल्लक नाही. सर्वत्र धूळ असल्याने नागरिकांचा खड्डय़ांबरोबर धुळीचाही त्रास सहन करावा लागत आहे. राघवेंद्र सलगर, स्थानिक रहिवासी.


तक्रार करूनही दखल नाही


या रस्त्यावरून दुचाकी वा चारचाकी वाहन जाणे मुश्किल झाले आहे. महाविद्यालयांचे विद्यार्थिनी याचा रस्त्यावरून ये-जा करतात.रोज किमान दोन तरी अपघात घडतात. रस्ता दुरुस्त करण्याविषयी मनपा अधिकारी व नगरसेवकाकडे तक्रारी करूनही रस्ता दुरुस्त झाला नाही. बाळासाहेब होमकर, स्थानिक रहिवासी.

ड्रेनेज लाइन व जलवाहिनीसाठी दयानंद कॉलेज ते कुंभार वेस रस्ता खोदण्यात आल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत, मात्र रस्त्याची दुरुस्ती न केल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.