आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्यप्रेमींची सतर्कता: अपघातातील जखमी हरणाचे वाचले प्राण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अज्ञात वाहनाची धडक बसल्याने रस्त्याच्या बाजूला वेदनेने विव्हळणार्‍या हरणाचे पोलिस व वनकर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले. कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील मल्लिकार्जुन ढाब्याच्या जवळ रस्ता ओलांडणार्‍या हरणाला एका अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यामध्ये हरणाचा पुढील उजवा पाय मोडल्याने तळपत्या उन्हात माळरानावर विव्हळत पडले होते. त्याबाबतची माहिती एका शेतकर्‍याने वळसंग पोलिसांना दिली. त्यांनी त्वरित त्या जखमी हरणाला उपचारासाठी वळसंग येथील पशुवैद्यकीय केंद्रात दाखल केले.

रानवेध निसर्ग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्वरित वनविभागास त्याबाबतची माहिती दिली. वनरक्षक एम. बी. मठपती यांनी घटनास्थळी जाऊन त्या हरणाला ताब्यात घेतले. माणसांच्या गर्दीमुळे तणावग्रस्त झालेल्या हरणाला त्वरित घटनास्थळी आणले. नैसर्गिक वातावरणात त्यास औषध व पाणी पाजून निसर्गात मुक्त करण्याचा प्रयत्न केला. पण, पायाला गंभीर मार लागल्याने ते चालू शकले नाही. त्यामुळे पुढील उपाचारास त्यास महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल केले असून, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास लांडगे उपचार करीत आहेत.

वन्यजीवांची वेदना मुकी
अपघातामध्ये हरिण जखमी झाल्याची माहिती शेतकर्‍याने ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला कळवली. अपघातग्रस्त वन्यजीवांवरील उपचारांसाठी जिल्ह्या रेस्क्यू सेंटर नसल्याबाबत ‘दिव्य मराठी’ने शनिवारी डीबीस्टार मध्ये ‘वन्यजीवांची वेदना मुकी’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. शेतकरी, पोलिस, निसर्ग मित्रांच्या प्रयत्नांमुळे जखमी हरण उपचारासाठी दाखल झाले, अन्यथा वेदनेने विव्हळत त्याने प्राण सोडला असता.