आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death News In Marathi Brothers Died While Swimming, Divya Marathi

मोहोळमध्ये कालव्यात बुडून भावांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कालव्यात पोहताना बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास येथील डाव्या कालव्याच्या लांबोटी वितरिकेच्या गाढवे वस्तीजवळील फाट्यात ही घटना घडली. सिद्धाराम कल्लप्पा बने (वय 8) व रेवणसिद्ध कल्लप्पा बने (वय 7, मूळ रा. धुळखेड, ता. इंडी, जि. विजापूर) अशी त्या दोन्ही मुलांची नावे आहेत. ते दोघेही सख्खे भाऊ आहेत.
याप्रकरणी मुलांचे वडील कल्लप्पा बने यांनी येथील पोलिसांत खबर दिली आहे. बने हे डॉ. शैलेश झाडबुके यांच्या शेतात सालगडी म्हणून कामास आहेत. महिन्यापूर्वी ते या कामावर आले आहेत. रविवारी दुपारी सिद्धाराम व रेवणसिद्ध हे दोघेही पोहण्यासाठी कालव्यात गेले. पाण्याचा प्रवाह जास्त होता. त्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडून मरण पावले. या घटनेची येथील पोलिसांत नोंद झाली आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे हे तपास करत आहेत.
पालकांचे ऐकले नाही
कालव्यात मोठय़ा प्रमाणात पाणी असल्याने तिकडे जाऊ नका, असे कल्लप्पा व त्यांच्या पत्नीने मुलांना बजावले होते. ते येथील आठवडा बाजारात खरेदीला येण्यासाठी शेतीकामे आवरून तयारीत गुंतले होते. मात्र, दोन्ही मुले नजर चुकवून कालव्यात पोहण्यासाठी गेली होती. बाजाराला निघण्यापूर्वी हाक मारली असता त्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली.
खूपच उशीर झाला होता
कल्लप्पा व त्यांची पत्नी मुलांचा शोध घेत कालव्याजवळ आले. तेथे त्यांना दोन्ही मुलांचे कपडे दिसले. तेथून त्यांनी हाक मारली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने कालव्यात उडी घेऊन त्यांचा शोध घेतला. कालव्यात पाण्याचा वेग कमी करण्यासाठी बांधलेल्या भिंतीजवळ दोघेही सापडले. पत्नीच्या मदतीने त्यांनी दोघांना बाहेर काढून शरीरातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु खूपच उशीर झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला होता.
मृत मुले कर्नाटकच्या सीमाभागातील धुळखेडचे