आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेसाठी 35 जागा मागणार - रामदास आठवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइं 30 ते 35 जागा व लोकसभेसाठी तीन-चार जागा महायुतीकडे मागेल, असा दावा रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत राज ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘मनसे अध्यक्ष युवकांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. शिवसेनेत कार्याध्यक्षपद रिकामेच आहे. ते राज यांना मिळावे यासाठी प्रयत्न करू,’ अशी ग्वाहीसुद्धा आठवलेंनी दिली.

सुप्रिया सुळे यांची राज्यसभेतील जागा आपल्याला देण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शवली होती, पण महायुतीत आल्यामुळे आपण ती नाकारली, असा गौप्यस्फोट आठवले यांनी केला. पवार आगामी लोकसभा निवडणूक माढ्यातून लढवणार नसतील तर तिथे उभे राहण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.
खासगी क्षेत्रात आरक्षण द्यावे, पदोन्नतीत आरक्षणाचा कायदा करावा, दलित आदिवासी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता 75 टक्के आरक्षण द्यावे, बेरोजगारांना पाज हजार रुपये भत्ता द्यावा यासह इतर मागण्यांसाठी 13 मार्चला संसदेवर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

जात मनातून काढा
प्रकाश आंबेडकर यांनी दाखल्यावरून जात काढण्याचे आवाहन केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, दाखल्यावरून जात काढण्यापेक्षा मनातली जात काढावी लागेल. विधानसभा आणि लोकसभेसाठी आरक्षण काढू नये. मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारनेच घ्यायला हवा.

दुष्काळासाठी 5 हजार कोटी रूपये हवेत
राज्यात सध्या 1972 पेक्षाही तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाड्यासह अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्याला पाच हजार कोटींची मदत जाहीर करावी. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील पावसाचे पाणी राज्यातील इतर धरणांत साठवण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी, जलसिंचनाचे व्यवस्थित नियोजन करावे या मागण्याही रामदास आठवले यांनी केल्या.