आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारमंत्र्यांसमाेर निदर्शने, शेतकऱ्यांवर बेदम लाठ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उसाला एफआरपी देणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करावे, शेतकऱ्यांची सर्वच बिले थकवणाऱ्या बार्शी तालुक्यातील आर्यन शुगर्स कारखान्यावरील कारवाई पूर्ण करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यासाठी गेलेल्या जनहित शेतकरी संघटनेच्या २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी गुन्हेगारांसारखे मारले. शेतकरी पळत असताना त्यांचा पाठलाग केला. त्यांना मारत मारत ताब्यात घेतले. सहकारमंत्र्यांच्या आदेशामुळेच पोलिसांनी आमच्यावर लाठीमार केला, असा अारोप जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख भैय्या देशमुख यांनी केला आहे.

कस्तुरबा मंडई येथील लिंगशेट्टी मंगल कार्यालयात भाजप कार्यकर्ता मेळावा होता. मेळाव्यास हजेरी लावून परतत असताना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडविली. भय्या देशमुख यांनी पाटील यांना निवेदन दिले आणि त्यांना गाडीतून खाली उतरण्याचा आग्रह केला. सुनावणी झाली, कारवाई करण्यास वेळ लागेल असे म्हणत निवेदन द्या, असे मंत्री म्हणाले. त्यावर किती वेळा निवेदन द्यायचे, असा प्रतिप्रश्न देशमुख यांनी केला. गाडीसमोर बसलेल्या शेतकऱ्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार सुरू केला. निरीक्षक ईश्वर ओमासे यांनीही लाठीमार केला.
सहकार मंत्र्यांनीच पोलिसांना आदेश दिले
सहकारमंत्रीचंद्रकांत पाटील माझ्याशी दोन मिनिट बोलले. त्यानंतर त्यांनी आम्हाला दूर जाण्यास सांगितले. आम्ही, आमचे म्हणणे नीट तरी ऐकून घ्या, असे म्हणत होतो. तेव्हाच त्यांनी पोलिसांना इशारा केला. "अरे तुमच्या हातात काठ्या आहेत, बघताय काय?' असे सांगून चंद्रकांत पाटील यांनीच पोलिसांना आमच्यावर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात मावळमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. भाजपचे सरकार तर सर्वच शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. फडणवीस सरकारचे हे दिवस "अच्छे दिन' नसून, शेतकऱ्यांसाठी काठ्या खायला लावणारे दिन आहेत. चंद्रकांत पाटील एफआरपी देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करू, असे सांगत असले तरी ते केवळ स्टंटबाजी करीत आहेत. त्यांना यापुढील काळात सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही.
प्रभाकर देशमुख, प्रमुख, जनहित शेतकरी संघटना.

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अचानक केलेल्या लाठी हल्ल्यानंतर कार्यकर्त्यांची पळापळ झाली.
आम्ही जमाव पांगविला निवेदन देणे, आंदोलन करणे योग्य आहे. पण रस्त्यावर झोपणे, वाहन अडवणे हे योग्य नाही. मंत्र्यांचा वाहनताफा मोकळा करण्यासाठी बळाचा वापर केला. -रवींद्र सेनगावकर, पोलिस आयुक्त

लाठीमार नव्हे, बाजूला केले
मागण्यांचे निवेदन घेऊन भय्या देशमुख यांनी गाड्यांचा ताफा अडवला. त्यांच्या मागण्या आम्हाला माहीत आहेत. त्यावर चर्चाही सुरू असल्याचे सांगितले. परंतु त्यांनी ऐकले नाही. रस्ता अडवून ठेवला. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केला. लाठीमार झालेला नाही. -चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री
बातम्या आणखी आहेत...