आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Department Of Education,Latest New In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकांचे जि.प. समोर हलगीनाद आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभाराबाबत आणि प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न न सुटल्यास जिल्हा शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेच्या गेटसमोर हलगीनादासह धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अधिकार्‍यांनी प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन दिले.
सोलापूर जिल्हा शिक्षक संघ
शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कामाविरोधात व प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न न सुटल्यामुळे जिल्हा शिक्षक संघाच्या वतीने दुपारी दोन वाजता हलगीनादासह धरणे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती जिल्हाध्यक्ष म. ज. मोरे कार्याध्यक्ष ज्योतीराम बोंगे यांनी दिली. यावेळी 10 हलगीधारकांनी हलगीनाद करून जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला होता.
शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षण सेवकांना नियमित करणे व प्राथमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनर्शेणीचा लाभ देणे हे प्रश्‍न प्रलंबित आहेत. शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांनी प्रश्‍न निकाली काढतो, असे आश्वासन दिले होते. मात्र दीडवर्ष होऊनही प्रश्‍न मार्गी लागले नाहीत. 61 शिक्षकांना नियमित करणे, गेल्या 9 महिन्यापासून ही फाईल प्रलंबित आहे. प्राथमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनर्शेणी मिळवून देण्याचा प्रलंबित प्रश्‍न गेल्या 3 वर्षापासून आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्‍न निकाली न लागल्यामुळे शिक्षक संघाने आंदोलन केले आहे. यावेळी जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस बब्रुवन काशिद, कार्याध्यक्ष ज्योतीराम बोंगे, कोषाध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, प्रसिद्धीप्रमुख संजय सावंत, उपाध्यक्ष सुहास जाधव, भगवानराव चौगुले, गणेश खांडेकर, हरिभाऊ जाधव आदींसह हजारो शिक्षक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती
खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी 11 हलग्या वाजवून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हलगीनाद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष जयवंत हक्के यांनी दिली.
शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर संघटनेकडून वारंवार प्रश्न घेऊन सोडवणूक केली असून, उर्वरित प्रश्नांसाठी संघटना सतत झटत असून, प्रलंबित प्रश्न प्रखरपणे शासनासमोर मांडून सोडवून घेण्यासाठी संघटनेकडून चार हुतात्मा पुतळा येथून हलगीनाद धडक मोर्चा काढला. सोलापूर शहर व जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या अतिरिक्त कर्मचार्‍यांचे वेतन, सेवक संच, पाचवी वर्ग जोडणे, वेतनेतर अनुदान, मुख्याध्यापक वेतनर्शेणीस संरक्षण आदी मागण्यासाठी मोर्चा काढला.
संस्थापक अध्यक्ष भरत रसाळे, राज्याध्यक्ष जयवंत हक्के, राज्यसचिव संतोषकुमार घोडके, राज्यप्रमुख राजेंद्र बुध्याळ, बाळासाहेब आवारे, विभागीय अध्यक्ष प्रकाश कोळी, कार्याध्यक्ष निंगप्पा तळवार यांच्या नेतृत्वाखाली हलगीनाद धडक मोर्चा काढण्यात आला.