आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Department Of Electronics,Latest News In Divya Marathi

लिफ्ट परवाना मिळाल्याशिवाय; इमारत वापर परवाना देऊ नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विद्युत विभागाकडून लिफ्ट वापरण्याचा परवाना मिळत नाही, तोपर्यंत इमारत वापरण्याचा परवाना देऊ नये, असे पत्र महापालिकांना देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (लिफ्ट) साहाय्यक विद्युत निरीक्षक सुधीर राठोड (मुंबई) यांनी सांगितले. फ्लॅटधारकांनीही सर्व बाबी पडताळूनच सदनिका ताब्यात घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. दत्त चौकातील शाश्वत मॅजेस्टिक या इमारतीच्या लिफ्टमध्ये विजेचा धक्का लागून राजलक्ष्मी शिंदे या मुलीचा मृत्यू झाला. हा अपघात कशाने झाला, त्याला जबाबदार कोण, पुढे काळजी कोणी घ्यायची या प्रश्नांची उकल करण्यासाठी ‘दिव्य मराठी’चा पाठपुरावा सुरू आहे. लिफ्टसंदर्भात परवाना देणारी यंत्रणा मुंबईत आहे. या यंत्रणेकडून तांत्रिक बाबी तपासल्या जातात. त्यानंतरच इमारत परवाना देण्याची शिफारस करण्यात येते. परंतु ही बाब बहुतांश लोकांना माहीत नाही. त्याची शहानिशा केल्याशिवाय सदनिका ताब्यात घेतात. राहतात. त्यामुळे घडणा-या अपघातांना जबाबदार कोण हा प्रश्न उभा राहतो.
लिफ्टसाठी ही प्रक्रिया
लिफ्ट बसविण्यापूर्वी ‘ए’ फॉर्म दिला जातो. तो देताना इमारतीचा बांधकाम परवाना, ले-आऊट, लिफ्ट बसवणा-या एजन्सीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्याची तपासणी झाल्यानंतर परवानगी मिळते. लिफ्ट वापरण्यासाठी ‘बी’ फॉर्म भरून द्यावा लागतो. मुंबईतून संबंधित अधिकारी येतात. लिफ्ट व इमारतीची पाहणी करून परवाना देतात.
पोलिसांच्या स्मरणपत्रानंतर दिली महापालिकेने माहिती
लिफ्टमध्ये अडकून राजलक्ष्मी शिंदे हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी महापालिकेकडे माहिती मागितली. ती दिली नाही म्हणून पोलिसांनी स्मरणपत्र दिले. त्यानंतर माहिती देण्यात आली. बांधकाम परवानगीसाठी दिलेले 58 पानांचे कागदपत्रे दिले, असे उपअभियंता पी. एस. सावंत यांनी सांगितले. बांधकाम परवानगी देताना लिफ्टची परवानगी दिली. लिफ्ट लावण्याबाबत विकास नियंत्रण नियमावली नुसार तरतूद आहे. शाश्वत अपार्टमेंट बिल्डरचे नाव मनोज गजकुमार शहा असल्याची माहिती देण्यात आल्याचे ते म्हणाले.
अहवाल लवकरच
लिफ्टमधील मुलीच्या मृत्यूचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारला दिला आहे. अंतिम अहवालही लवकरच देऊ. घटनेची दखल घेऊन इमारतीतील सर्व सदनिकाधारकांना नोटिसा बजावल्या.’’सुधीर राठोड, साहाय्यक विद्युत निरीक्षक (लिफ्ट), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई
लिफ्टची पाहणी झाली
राजलक्ष्मी शिंदे हिचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अहवालात आली आहे. त्यादृष्टीने नातेवाईकांची चौकशी केली. लिफ्ट विभागाकडून अपघातग्रस्त लिफ्टची पाहणी झाली.’’
सुरेश डोके, फौजदार, तपास अधिकारी फौजदार चावडी