आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगपती पोसण्यासाठी मोदींचा देशावर ताबा; अजित पवार यांचा पंतप्रधानांवर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘उद्योगपतींना पोसण्यासाठीच मोदी यांनी देश ताब्यात घेतला आहे,’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली.अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेन कुणासाठी सुुरू केली? रेल्वे अर्थसंकल्पातून सामान्यांना काय दिले? दोन महिन्यांतच ही स्थिती तर पुढील पाच वर्षांत काय होईल? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री दिलीप सोपल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, केंद्रात मोदींचे सरकार आले. त्यानंतर रिलायन्सला पहिल्या तिमाहीतच 5 हजार कोटींचा नफा झाला. दुसरीकडे रेल्वेभाडे, पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होऊन सामान्यांचे जगणे मुश्कील झाले. शेतकरी, शेतमजूर, कामगारांसाठी मोदी सरकारकडे कुठलाच कार्यक्रम नाही. यानंतरही ते बुलेट ट्रेनची घोषणा करतात. तेही महाराष्ट्रासाठी नव्हे, तर गुजरातच्या उद्योगपतींसाठी. त्यांना मुंबईत येणे सुकर व्हावे, यासाठीच बुलेट ट्रेनचा प्रस्ताव दिसतो. त्यासाठी 60 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. जे महाराष्ट्राच्या एकूण बजेटपेक्षा जादा आहे,’ अशा शब्दात त्यांनी रालोआ सरकारचा समाचार घेतला.
उद्धव शरीफांच्या मागे बसलेले सेनेला चालते?
शिवसेनेला पाकिस्तानचे खेळाडू चालत नाहीत, कलावंत चालत नाहीत. जावेद मियाँदाद मात्र ‘मातोश्री’वर आलेला चालतो. मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेताना उद्धव ठाकरे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मागे बसलेले होते. हे दृश्य पाहून बाळासाहेबांना काय वाटले असते? याचाच अर्थ जातीयवादी राजकारण करताना स्वत:च्या सोयीचे राजकारणच करताय. 19 खासदार निवडून आणल्याची टिमकी उद्धव वाजवताहेत खरी; पण त्यात त्यांचा वाटा किती? मोदींच्या नावाने खासदार निवडून आले, हे त्यांनी विसरू नये, असा टोलाही पवारांनी लगावला.