आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- दुष्काळी स्थितीतही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल 400 कोटी रुपयांनी वाढली. गेल्या वर्षी 1250 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ती यंदा 1600 कोटींची झाली. राज्यातील पहिली कर्जमुक्त बाजार समिती असा नावलौकिक मिळवला, अशी माहिती समितीचे सभापती आमदार दिलीप माने यांनी दिली.
समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी हैदराबाद रस्त्यावरील वि. गु. शिवदारे सभागृहात झाली. त्या वेळी ते बोलत होते. उपसभापती राजशेखर शिवदारे, ज्येष्ठ नेते तम्मा गंभिरे, सदस्य प्रवीण देशपांडे, सिद्धाराम चाकोते, सोजर पाटील, उत्तरेश्वर भुट्टे, इंदुमती अलगोंडा, शांताबाई होनमुर्गीकर, चंद्रकांत खुपसंगे, बसवराज दुलंगे आदी मंचावर होते.
समितीच्या प्रगतीचा आढावा घेत माने यांनी भविष्यातल्या योजना सांगितल्या. भाव चांगला मिळतो म्हणून राज्यातील शेतमाल उत्पादक या समितीच्या आवारात येत आहेत. खरेदी-विक्रीची प्रक्रिया पारदर्शक केल्याने उत्पादकाला पहिल्याच दिवशी पैसे मिळतात. हा विश्वास मिळाल्यानेच उलाढालीत वाढ झाल्याचे माने यांनी निदर्शनास आणून दिले.
संकेतस्थळ अन् एसएमएस सेवा
समितीचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. दिवाळीच्या आतच ते कार्यान्वित होईल. त्यासोबतच शेतकर्यांसाठी एसएमएस सेवा सुरू करत आहोत. या सेवेच्या नेटवर्कमध्ये येणार्यांना दैनंदिन बाजारभावांचे ‘एसएमएस’ पाठवण्यात येतील. ऑनलाइन कारभारासंदर्भात व्यापार्यांची मानसिकता अद्याप दिसून येत नाही. त्यांची तयारी झाली की, समितीचा संपूर्ण कारभार ऑनलाइन होईल, अशी माहिती माने यांनी दिली.
शुद्ध पाण्याचा प्रकल्प
समितीच्या आवारात दररोज 10 हजार जणांची ये-जा असते. व्यापारी, विक्रेते, ग्राहक, वाहतूकदार, हमाल, तोलार अशा सर्वांची तहान भागवण्यासाठी शुद्ध पाण्याचा प्लांट सुरू करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी पाच लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्यात येईल. त्याला आरओ सिस्टिम जोडून प्रत्येक दुकानात नळजोड देऊ. या पाण्याला कुठलाच आकार समिती घेणार नाही.
20 मिनिटांत सभा समाप्त
सव्वाअकराला सुरू झालेली सभा अवघ्या 20 मिनिटांत संपली. सदस्य सिद्धाराम चाकोते यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर माने बोलले. त्यांच्या भाषणानंतर सदस्यांमधून एकही प्रश्न आला नाही. माने यांनीच सभा संपल्याची घोषणा केली. सगळे निघून गेल्यानंतर पदसिद्ध सदस्या महापौर अलका राठोड यांचे आगमन झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.