आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारामुळे अर्थव्यवस्था मंदावली - देवेंद्र फडणवीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्रातील कोळसा, टूजी, राष्ट्रकुल घोटाळे आणि राज्यातील सिंचन व आदिवासी अनुदान घोटाळ्यांनी बड्या नेत्यांच्या घरातील तिजोर्‍या भरल्या. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली. वाजपेयी पंतप्रधान असताना डॉलरची किंमत 35 रुपये होती. आज 60 रुपये झाली. ही स्थिती अशीच राहिल्यास देशातील सोने पुन्हा एकदा गहाण ठेवण्याची वेळ येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिला.

पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सोलापूरला आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल करीत भ्रष्टाचार पोसणार्‍या या पक्षांना आगामी निवडणुकीत हद्दपार करण्याचे आवाहन केले. गावडे मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मोदी आणि राहुल गांधी यांचा सामना होणार अशी चर्चा झाली. परंतु, देशावर जेव्हा जेव्हा संकटे ओढवली तेव्हा भावी पंतप्रधानपदाचे दावेदार असणारे राहुल गांधी होते कुठे? उत्तराखंडमध्ये महाप्रलय आले. मोदी यांनी विमानाने जाऊन लोकांना बाहेर काढले. ‘निर्भया’ प्रकरणाने देश हेलावला. राहुल गांधींचा पत्ता नव्हता. दिल्लीत अण्णा हजारेंचे 14 दिवस उपोषण झाले. देश त्यांच्या सर्मथनार्थ उभा राहिला. अवघी तरुणाई त्यांच्या सोबत होती. परंतु, राहुल गांधी दिसत नव्हते. जो माणूस देशातील संकटांचा सामना करू शकत नाही; तो पाकिस्तान आणि चीनचा सामना कसा करू शकेल? या सर्व घडामोडींनी जनतेत प्रचंड असंतोषाची खदखद आहे. त्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.’’

श्री. तावडे म्हणाले, ‘‘राज्यातील मंत्र्यांनी भ्रष्टाचारासाठी एकही खाते सोडलेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी असे ठरवले, की एकमेकांच्या खात्यात लुडबूडच करायचे नाही. निवडणुकीत मते विकत घेतात. त्यासाठी प्रचंड पैसा जमा करण्याचेच त्यांनी सुरू केले.’’

या वेळी आमदार विजयकुमार देशमुख, सावरकर विचार मंचचे अध्यक्ष अँड. शरद बनसोडे, माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू यांचीही भाषणे झाली. नगरसेवक प्रा. अशोक निंबर्गी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रदेश सचिव सुजितसिंह ठाकूर, संघटनमंत्री रवींद्र भुसारी, संभाजी पाटील निलंगेकर, बाळासाहेब बेगडे, सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते कृष्णाहरी दुस्सा, व्यापारी महासंघाचे प्रमुख प्रभाकर वनकुद्रे, भारतीय मजदूर संघाचे प्रकाश आळंदकर आदी उपस्थित होते.

सुभाष देशमुखांसह 8 नगरसेवक गैरहजर
पक्षाचा पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा असताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष देशमुख यांच्यासह नगरसेवक नागेश वल्याळ, पांडुरंग दिड्डी, नरेंद्र काळे, मोहिनी पत्की, रोहिणी तडवळकर, इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली यांची गैरहजरी मेळाव्यात दिसून आली.

मेळाव्यातील ठळक
1. माजी खासदार सुभाष देशमुखांसह नाराज आठ नगरसेवकांची अनुपस्थिती
2. माजी खासदार संदीपान थोरात यांचे पुत्र अनिल थोरात यांच्यासह लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाचे चालक देविदास गुंडेटी यांचा भाजपमध्ये प्रवेश
3. पक्षाच्या गद्दार नगरसेवकांची हकालपट्टी करण्याच्या जोरदार घोषणा
4. फडणवीस, तावडेंचा फेटा बांधून सत्कार, ढोल-ताशांचा प्रचंड निनाद

टार्गेट पवार-शिंदे
1. कृषिमंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदेंचा सोलापूर दौरा म्हणजे निवृत्तीचा निरोप आहे : देवेंद्र फडणवीस
2. सोलापूरच्या दूषित पाणीपुरवठय़ासह बुद्धगयेच्या बॉम्बस्फोटापर्यंतची उत्तरे शिंदेंना द्यावी लागतील : विनोद तावडे
3. सोलापुरात दूषित पाण्याने नागरिक मेले, धुळीने श्वसन विकारांचे रुग्ण झाले. नेते मॅडम मॅडम करून पुढे गेले : अँड. शरद बनसोडे