आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजास आरक्षण न दिल्यास आगामी निवडणुकीत करणार विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात काँग्रेस आघाडी सरकारवर टीका, टीप्पणी करण्यात आली. आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर निवडणुकीत विरोधात जाण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसची नेतेमंडळी या आंदोलनात आघाडीवर होती, हे उल्लेखनीय.

सोलापूर जिल्हा धनगर समाज अनुसूचित जमात आरक्षण कृती समितीतर्फे बुधवारी बाळे येथील राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्वपक्षीय धनगर समाजातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर समाज बांधवांना आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करावा. विनाकारण टाळाटाळ करत धनगर समाजाची फसवणूक सत्ताधा-यांनी केलीय, असा आरोप शिवाजी पिसे यांनी केला.

भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले, ‘धनगर समाजाचे नेते, माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी राजीनामा दिल्याने तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे विधानसभेचे आमदार झाले. पण, नंतर देवकतेंचे पुनर्वसन झाले नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट न केल्यास शहर व परिसरातील भाजप, काँग्रेसचा एकही आमदार निवडून येऊ देणार नाही. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून धनगर समाजातील व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके म्हणाले, ‘‘शांत व प्रामाणिक असलेल्या धनगर समाजला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी करतोय. पण, त्यांनी दुर्लक्ष करत समाजबांधवांची फसवणूक केलीय. समाजाच्या प्रश्नांची दखल न घेणा-या पक्षात राहण्याची गरज काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नगरसेवक चेतन नरोटे म्हणाले, ‘‘आपल्या मागण्यांसाठी जिल्ह्यात येणारे मंत्री, आमदारांना घेराव घालणे यासह वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनासाठी समाजबाधवांनी सज्ज रहावे.’’

या आंदोलनात जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख, दीपक राजगे, राज सलगर, अर्जुन सलगर, मंद्रूूप येथील अनिकेत पांढरे-पाटील, बिळेणी सुंटे, सागर टेळे यांच्यासह दक्षिण व उत्तर सोलापूर, मोहोळ, सांगोला, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिवळे फेटे अन् झेंडे
आंदोलनात सहभागी झालेले समाजबांधव पारंपरिक ढोल वाजवत डोक्यावर पिवळ्या रंगाचे फेटे, ‘मी मूळ अदिवासी’ असे लिहिलेल्या टोप्या व झेंडे घेऊन सहभागी झाले होते. सकाळी चार हुतात्मा पुतळा चौकातील आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोटारसायकलवर अनेक कार्यकर्ते बाळे चौकात गेले. सर्वत्र लावलेले झेंडे व भंडा-याची उधळण केल्यामुळे चौकाचा परिसर पिवळाजर्द झाला होता.

माजी मंत्री देवकते यांना रुग्णालयात हलवले
आंदोलनात सहभागी झालेले माजी मंत्री आनंदराव देवकते यांना अचानक चक्कर आल्याने तत्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांची प्रकृती स्थिर असून आंदोलन सुरूच ठेवा, असा निरोप त्यांनी दिल्याचे शेळके यांनी भाषणात जाहीर केले.