आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद महाविद्यालयात धन्वंतरी पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- चांगले आरोग्य देण्यासाठी शुक्रवारी धनत्रयोदशीला वैद्यमंडळींनी धन्वंतरीची पूजा केली. सकाळचा मुहूर्त असल्याने प्रात:समयीच कुटुंबासह पूजा झाली. आयुर्वेद दवाखाने, रुग्णालयांमध्ये त्याची लगबग होती. धन्वंतरी पूजेसोबत धनाचा अधिपती असलेल्या कुबेराचीही पूजा झाली. नवीन गादी, नव्या वह्या आणि नव्या करकरीत चलनी नोटा ठेवून भक्तिभावाने पूजा झाली.

गुरुवारी वसुबारसनिमित्त गाई-वासराची पूजा करण्यात आली. शुक्रवारी धनत्रयोदशीचा विधी झाला. शनिवारी नरक चतुर्दशी असून, त्याने दीपोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून, बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह अद्याप कायम आहे. मधला मारुती, टिळक चौकात पूजेचे साहित्य, मिठाई, फटाके आदी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती.

झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली. केळीच्या पानांसोबत मोठे खुंटही दाखल झाले. त्यामुळे बाजारपेठेत मांगल्याचे वातावरण आहे. येथील आयुर्वेद रसशाळा, आयुर्वेद महाविद्यालय, आयुर्वेदिक दवाखाने, घरगुती पद्धतीने आयुर्वेद उपचार करणारे वैद्य यांच्या घरी आणि कार्यस्थळी धन्वंतरीची पूजा झाली

आयुर्वेदाचे जनक
समुद्रमंथनातून अमृत घेऊन आलेल्या धन्वंतरींनी देवांना अमृत पाजून अमर केलेली आख्यायिका आहे. अमरत्व देणारा हा दिवस म्हणूनही धन्वंतरीची पूजा होते. धन्वंतरी आयुर्वेद प्रवर्तक, आरोग्य देवता मानली जाते. धनुचा अर्थ शल्य. म्हणजेच जो शल्यशास्त्राच्या विषयात पारंगत आहे तो धन्वंतरी, असे शहरातल्या आयुर्वेदाचार्यांनी सांगितले.

आज नरक चतुर्दशी
दीपोत्सवाचा पहिला दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. सुगंधी उटणे लावून स्नान करावे. त्यानंतर यमतर्पण करावे. वाहनांची संख्या वाढली, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाला 14 नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करावी. मोहन दाते, पंचांगकर्ते