आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्र बनावट असल्याचा धर्मा भोसलेंचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - काँग्रेसच्या 20 पदाधिकार्‍यांच्या आपल्या विरोधातील निवेदनात काही सह्या बनावट असल्याचा दावा शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी रविवारी केला होता. बस डेपो विकसित करण्याच्या मुद्दय़ावर महापौरांना त्यांच्या नावे दिलेले पत्रच बनावट असल्याचा दावा भोसले यांनी सोमवारी केला.

आपल्याच पक्षातील पदाधिकार्‍यांनी उघडपणे विरोधी भूमिका घेतल्याने अडचणीत आलेल्या र्शी. भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन बचावाच्या प्रयत्नांतील शेवटचे अस्त्र वापरत घूमजाव केला आहे. ‘बीओटी’वर देण्यास हरकत नसून, ती चालू बाजारभावाप्रमाणे द्यावी, असे म्हणणे असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. त्याही पुढे जात पत्रावरील बनावट सही करणार्‍यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा मनोदय व्यक्त केला. विशेष म्हणजे, ‘दिव्य मराठी’स शुक्रवारी (दि. 21) माहिती देतानाही श्री. भोसले यांनी विरोध असल्याचेच सांगितले होते.

विविध कामे केली
पक्ष संघटन वाढीस लागण्यासाठी काय केले असा थेट सवालही पदाधिकार्‍यांनी निवेदनात केला होता. त्यास उत्तर देताना भोसले यांनी विविध कार्यक्रम राबवल्याचे म्हटले आहे. त्यात स्वातंत्र्य दिवस, पक्ष स्थापना दिन, महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन, बलिदान दिन साजरे केले. महापालिका पदाधिकारी निवडण्यासाठी समन्वय समितीची बैठक घेतली. निवडणुकी संदर्भात पदाधिकार्‍यांची बैठक, ब्लॉक / फ्रंटल / सेल अध्यक्षांच्या बैठका, शिबिर, मेळावा आदी कार्यक्रम घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पत्रकार परिषदेस सुनील रसाळे, हाजीमंलग नदाफ, नामदेव फुलारी, माणिकसिंग मैनावाले, डॉ. सायबू गायकवाड आदी उपस्थित होते.

पत्राची प्रत मुख्यमंत्र्यांनाही
श्री. भोसले यांनी महापौरांना 27 फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या पत्रात, यापूर्वी झालेल्या ‘बीओटी’ तत्त्वावरील कामांमधून महापालिकेस लाभ झालेला नाही. त्यामुळे डेपोवरील जागा महापालिकेने स्वत:च विकसित करावी, असे म्हटले आहे. जागा राज्य सरकारची आहे. 1980 पासून महापालिका वापरत आहे. 25 फेब्रुवारी 2013 रोजीच्या राज्याच्या पत्रकानुसार ही जागा महापालिकेकडे हस्तांतर झालेली आहे. त्यापैकी 11 हजार 875 चौरस मीटर जागा डेपोसाठी वापरत आहे. ‘बीओटी’ तत्त्वावर दिल्यास काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आंदोलन करतील, असे पत्रात म्हटले आहे. पत्राची प्रत मुख्यमंत्री, आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, समन्वय समिती सर्व सदस्य, सभागृह नेता, सभापती-स्थायी समिती, नगरअभियंता, परिवहन समिती सदस्य यांनाही पाठवल्याचा उल्लेख पत्रावर आहे.

अध्यक्षांना मिळाले आव्हान
श्री. भोसले शहर विकासात खीळ घालत असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केला. सरचिटणीस राजन कामत, केशव इंगळे, अजय दासरी, सचिव अशोक चव्हाण, खजिनदार दिनेश जाधव, उपाध्यक्ष किसन मेकाले, अविनाश जाधव, मधुकर कोरे आदींच्या पत्रावर सह्या आहेत.

अध्यक्षपदात बदल नाही
लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत शहराध्यक्षपदात बदल नाही. राजीनामा मागणार्‍यांनी पक्षासाठी काहीही केलेले नाही. केशव इंगळे यांनी महापालिका निवडणुकीत पत्नीला बंडखोरी करायला लावली. पक्षाची बदनामी करणार्‍यांना नोटीस देणार. प्रदेश कमिटीला तसे कळवणार आहे.’’ धर्मा भोसले, काँग्रेस शहराध्यक्ष