आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhaygude Science Center Try For Create Scientific Approach In Students

विज्ञान रुजवण्यासाठी धायगुडे सायन्स सेंटरची धडपड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ज्ञान केवळ शाळेच्या प्रयोगशाळेच्या चार भिंतीतच मिळते असे नाही तर ते कोठेही सहज मिळू शकते, फक्त गरज आहे ती विद्यार्थ्यांमधील जिज्ञासावृत्ती वाढविण्याची. हाच ध्यास घेऊन गेल्या तीन वर्षांपासून सोलापुरातील धायगुडे सायन्स सेंटरची वाटचाल उत्साहाने सुरू आहे. नुकताच तिसऱ्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ करण्यात आला. इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांमध्ये सोप्या प्रयोगातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून होत आहे.
प्रा. डॉ. नागेश धायगुडे यांंनी निवृत्तीनंतर अशा सायन्स सेंटर उभारणीची संकल्पना सातत्याने मांडली. यासाठी सुरुवातीला प्रयत्न केले. मुलांची जिज्ञासावृत्ती प्रयोगशाळेच्या बंदिस्त चौकटीबाहेर पडली पाहिजे, तिला कल्पनाविष्काराचे मूर्त स्वरूप आले पाहिजे. नवनवे प्रयोग करण्यासाठी ही जिज्ञासा कामी येईल. त्यासाठी मुलांच्या प्रयोगशीलतेला व्यासपीठ मिळावे, ही ती मूळ संकल्पना. त्यांच्या अकस्मात निधनानंतर प्रा. वैशाली धायगुडे यांनी ही संकल्पना पुढे नेण्याचे ठरविले. कुमठा नाका येथील लक्ष्मी- विष्णू हौसिंग सोसायटीतील धायगुडे सरांचे वास्तव्य राहिलेल्या घराचे रूपांतरच या धायगुडे सायन्स सेंटरमध्ये केले गेले.
मदत, मार्गदर्शन करण्याची अपेक्षा
मुले, शाळांपर्यंत जाणारी विज्ञान गाडीची संकल्पना प्रा. धायगुडे यांनी मांडली. प्रत्यक्ष सायन्स सेंटरपर्यंत येणे- जाणे यात पालकांचाही वेळ जातो. तर मग सायन्स गाडीच मुलांच्या शाळेपर्यंत जाईल. त्यासाठीचे आवश्यक ती एक प्रयोगशाळाच गाडीत उभारली जाईल. पण यासाठी रक्कम लागेल. मात्र संकल्पनेसाठी समाजातील मान्यवर, शासन, स्वयंसेवी संस्थांकडून मार्गदर्शन निश्चित मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. असा प्रयोग पुण्यात स्वयंसेवी संस्थेकडून सुरू आहे.
विविध प्रयोग, व्याख्याने नावीन्यपूर्ण उपक्रम
सेंटरविषयी माहिती देताना धायगुडे म्हणाल्या, ‘सुरवातीला सायन्स शिक्षकांनाच प्रशिक्षण देण्याचा उपक्रम होता. त्यानंतर यात बदल करून प्रत्यक्षात मुलांपर्यंत जाण्याचे ठरविले. मोजक्या शाळांमध्ये पत्रे दिली. इच्छुक विद्यार्थ्यांना सायन्स सेंटरमध्ये पाठविण्याचे सूचित केले. शनिवारी रविवारी दोन दिवस वर्ग सुरू राहतील. त्यात विविध प्रयोग, कल्पक नावीन्यपूूर्ण उपक्रम, जिज्ञासावर्धक व्याख्याने, माहितीपट असा उपक्रम आखला. सहावी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले. अशा रीतीने सुरवात झाली.’

- विज्ञानाचा आधार घेतला तर कितीतरी प्रयोग साध्या साध्या साहित्यातून करता येतात, हेच मुलांना पटवून देण्याचे कार्य धायगुडे सायन्स सेंटरच्या माध्यमातून होत आहे. मुले येतात. काही साहित्य हाताळणी करतात. नवीन कल्पनाही मांडतात. वैज्ञानिक दृष्टी देण्याचा प्रयत्न आहे.''
प्रा. वैशाली धायगुडे, प्रमुख धायगुडे सायन्स सेंटर